लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेवू – शरद पवार
सांगोला ( महा ई न्यूज ) – माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी विनंती विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह पक्षातील वरिष्ठ सहका-यांनी केली. यावर पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करुन दोन दिवसात निर्णय घेवू, असं शरद पवार यांनी सांगोल्यातील दुष्काळी परिषदेत म्हटलं आहे.
यावेळी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आजही केली. तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आमदार गणपतराव देशमुख, आमदार जयंत पाटील यांनीदेखील पवारांनी माढयातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली.
शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?
माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.
2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.