राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार?

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार उद्या रविवारी सकाळी 11 वाजता होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच आरपीआय पक्षाला मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजभवनमधील वरिष्ठ सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा होणार आहे. राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार असून यासाठी मंडप टाकण्याच्या काम सुरू आहे. 250-300 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शपथविधी सोहळा यासाठी मंडप आणि आसनव्यवस्था काम सुरू केले. राजभवनाच्या दरबार हाॅलच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने गार्डनवर हा शपथविधी होणार आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या सात जागा रिक्त आहेत. आता या जागांवर कोणत्या कोणत्या नेत्याची वर्णी लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत चर्चा रंगली आहे. पुढील आठवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे.