राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३,६६,१२९ वर

- मुंबईत १,७१३, पुणे शहरात १,०४० नवे रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक प्रचंड घट्ट होत आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात १४ हजार ९७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ४३० कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या १३ लाख ६६ हजार १२९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३६ हजार १८१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच सध्या २ लाख ६० हजार ३६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल १ हजार ७१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख २ हजार ४८८ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ८८० इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ६७ हजार २०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या २६ हजार १ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात मंगळवारी १ हजार ४० नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ४० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ९९५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ३ हजार ४४६ इतका झाला आहे. तर दिवसभरात १ हजार ५४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा १ लाख २३ हजार ८२९ वर पोहोचला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये काल दिवसभरात ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ८०६ जण कोरोनातून बरे झाले. यासह पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ३१७ वर पोहोचली असून यापैकी ६४ हजार २८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.