भाजपला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी ; आमदार जगताप यांना मात्र अभय ?

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे, तर नगर शहर जिल्हाध्यक्षांना अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश दिला होता. मात्र तो डावलण्यात आला. पक्षाच्यावतीने सर्व नगरसेवकांना सात दिवसांत आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटीसीद्वारे देिली होती. परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणती कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा केला नसल्याने त्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या कारवाईत म्हटले आहे.
आमदार जगतापांना अभय ?
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिल्याच्या प्रकाराची गंभीर दखल पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा इशाराच पवार यांनी दिला होता. तर शरद पवार पवार यांच्याकडे खुलासा करण्यात आला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आम
दार संग्राम जगताप यांनी केला होता. नगर शहरावर सध्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले आणि कोतकर परिवाराचे वर्चस्व आहे. हे तिन्ही परिवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. जगताप यांच्या आशिर्वादाशिवाय राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपला पाठींबा देऊच शकत नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ही कारवाई करून नगरसेवकांचा बळी दिला आणि जगतापांना मात्र अभय दिले अशी चर्चा नगरमध्ये सुरु आहे.