प्रकाश आंबेडकर चुकीच्या मित्राकडे गेले, आता आमची अडचण झालीय – अशोक चव्हाण

नांदेड – भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘भारिप बहुजन’चे प्रकाश आंबेडकर हे चुकीच्या मित्रांकडे गेले आहेत, त्यामुळे आमची थोडीशी अडचण निर्माण झाल्याची कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे जाहीर सभेत दिली.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा शुक्रवारी शहरात दाखल झाली. या वेळी झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, आमदार हर्षवर्धन पाटील, डी. पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, वसंतराव चव्हाण, मधुकरराव चव्हाण, नसीम खान, विलास औताडे, बसवराज पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, महापौर शीला भवरे, जि. प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?
‘या भ्रष्टाचारी व थापाडय़ा सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बसप, समाजवादी पार्टी, शेकाप यांच्यासह अन्य पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे चुकीच्या मित्रांकडे गेले आहेत, त्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून सकारात्मक मार्ग निघेल.’