पोराला फटकावलं की पोरगं बापाला घेऊन येतं, अशी अवस्था मुख्यमंत्र्यांची झालीय – खासदार डॉ. अमोल कोल्हे

नाशिक | महाईन्यूज
राज्याच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांना दहा सभा आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना वीस सभा घ्यावा लागतात. “पोराला शाळेत फटकावलं की पोरगा बापाला शाळेत घेऊन येतो, तशी अवस्था मुख्यमंत्र्यांची झाली आहे”, त्यांना राज्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी चक्क पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना बोलवावे लागले, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आघाडीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. एका राज्याची निवडणूक असताना तुम्हाला पंतप्रधानांच्या दहा सभा घ्याव्या लागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वीस सभा घ्याव्या लागतात, यात तुम्ही कबुली देताय की पाच वर्षात तुमचं सरकार अपयशी ठरलं आहे. कारण आमच्याकडे असायचं की, पोराला शाळेत फटकावलं की पोरगा बापाला शाळेत घेऊन यायचा, तशी तर परिस्थती मुख्यमंत्र्यांवर नाही ना आली? असा टोला अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
आता कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा?
या निवडणुकीत विरोधकांचे बारा वाजणार आहेत.. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं चांगला भाव मिळेल, मात्र सरकारने निर्यात बंद केली आणि पाकिस्तानवरून कांदा आयात करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सांगा मुख्यमंत्री आता कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. 21 तारखेला बाहेर पडताना एकच आठवा ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. ती फिरवा, असं आवाहन त्यांनी केलं.