धुळे-नंदुरबारचा आजचा निकाल म्हणजे उद्याच्या राजकारणाची दिशा आहे – प्रविण दरेकर
मुंबई – धुळे-नंदूरबार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडीची मंत मोठ्या प्रमाणात फुटल्याचं धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळालं. या निकालावरुन महाविकास आघाडीतील मतभेद स्पष्ट झाले आहेत. हा निकाल उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे मिळून २१३ मतं होती. पण त्यांच्या उमेदवाराला अवघी 98 मतं मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मतभेद नसल्याचा कितीही दावा करत असले तरी त्यांच्यात अलसेल्या विसंवादाचा स्फोटच आज झाल्याचं दिसलं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. धुळे-नंदूरबारमधील मतदारांनी महाविकास आघाडीचा आदेश पाळला नाही. त्यामुळे हा निकाल म्हणजे उद्याच्या राजकारणाची दिशा आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल, हे आज स्पष्ट झाल्याचा टोला दरेकरांनी लगावला आहे.
भाजपचे उमेदवार अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाच्या १९९ मतदारांनी तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केलं होते. त्यात काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचं संख्याबळ १५७ असतानाही अभिजित पाटील यांना फक्त ९८ मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. महाविकास आघाडीकडे २१३ मतं असतानाही पाटील यांना ९८ च मतं मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.





