चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांकडून एव्हरेस्ट सर

चंद्रपूर : ‘मिशन शौर्य’ या धाडसी उपक्रमाअंतर्गत अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळांमधील १० आदिवासी विद्यार्थी महिनाभरापूर्वी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करण्यासाठी निघाले होते. यातील चार विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गाठले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवाडा येथील उमाकांत मडावी, परमेश आले, मनिषा धुर्वे आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा जिवती येथील कवीदास काठमोडे या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्हयाची मान अभिमानाने उंच केली आहे.
मिशन शौर्य हा उपक्रम आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून या विद्यार्थ्यांना अर्थमंत्री मुनगंटीवार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. या १० विद्यार्थ्यांपैकी आणखी २ विद्यार्थी येत्या २ दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील. या धाडसी, शूर, देशभक्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.





