‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण

‘मराठीचे माहेरघर’ हे बिरुद सार्थ ठरिवण्यामध्ये यश संपादन केलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’ने शुक्रवारी ८५ व्या वर्षांत पदार्पण केले. सध्याच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात अगदी रास्त तिकिट दरामध्ये मध्यमवर्गीयांना उत्तम दर्जाची करमणूक देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याने या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा पाठिंबा लाभत आहे.
इंदूर येथील सरदार किबे यांनी १९३४ मध्ये बांधलेल्या चित्रपटगृहाला किबे लक्ष्मी थिएटर असे नाव देण्यात आले होते. पुढे ‘प्रभात फिल्म कंपनी’ने हे चित्रपटगृह चालविण्यासाठी घेतल्यामुळे त्याचे नामकरण प्रभात चित्रपटगृह झाले. भाडेकरार संपल्यानंतर न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांचा निकाल लागून गेल्या अडीच वर्षांपासून हे चित्रपटगृह किबे यांच्याकडे आले असून ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असे नामकरण करण्यात आले. ८९४ आसनक्षमता असलेल्या या चित्रपटगृहात मराठी चित्रपटांनाच प्राधान्य देण्यात येते. चित्रपटगृह वातानूकुलित नसले, तरी सध्या एअर कूलिंग करण्यात आले आहे, असे अजय किबे आणि डॉ. सुरेश किबे यांनी सांगितले. आमचा हा व्यवसाय नसला तरी आजोबांनी उभारलेल्या वास्तुचे जतन करताना आम्हाला आनंद होत असल्याची भावना किबे बंधुंनी व्यक्त केली.