breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत: चऱ्होलीतील बैलगाडा शर्यतीमधील वाद अखेर मिटला!

आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी : आयोजक अन्‌ गाडामालकांमधील गैरसमज दूर

पिंपरी : अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यामातून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाली. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. बैलगाडा शर्यतीला कोणाताही पक्ष नाही. बैलगाडा हाच आमचा पक्ष असतो. ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत’ आयोजक आणि गाडामालकांमधील गैरसमज दूर झाला आहे, अशी ठाम भूमिका आमदार महेश लांडगे यांनी मांडली.

खेड तालुक्याचे माजी सभापती रामदास ठाकूर-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली खुर्द येथे ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महिंद्रा थार, ट्रॅक्टर, बुलेट आणि दुचाकी अशी मोठी बक्षीसेही ठेवण्यात आली होती. सलग पाच दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेला शेवटच्या दिवशी गालबोट लागले.

शिवराज आव्हाळे, आव्हाळवाडी, बाळासाहेब साकोरे, फुलगाव, विनायक मोरे, चिखली, रामनाथ वारिंगे, वारंगवाडी, बापुसाहेब आल्हाट, निघोजे आणि शिवराज आव्हाळे, आव्हाळवाडी या पाच गाडा मालकांना महिंद्रा थार गाडीचे बक्षीस विभागून देण्यात आले. फायनलच्या बारीदरम्यान रामनाथ वारिंग यांच्या गाडीने ११.५२ सेकंदात घाट पार केला, असा निर्णय पंचांनी दिला. मात्र, हा निर्णय वारिंगे यांना मान्य नव्हता. तसेच, आयोजक आणि पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे वाद निर्माण झाला. यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पंच आणि आयोजकांचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. पोलिसांच्या मदतीने वादाचा प्रसंग नियंत्रणा आणला. मात्र, बैलगाडा आयोजक आणि मालकांमधील वाद धुमसत होता.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आयोजक आणि गाडामालक यांची समोरासमोर बैठक घेण्यात आली. बैलगाडा शर्यत हा आपला परिवार आहे. त्यामुळे परिवारातील वाद सामंजस्याने मिटवण्याची भूमिका घेण्यात आली. यावेळी आयोजक रामदास ठाकूर-पाटील, गाडामालक रामनाथ वारिंगे, शिवराज आव्हाळे यांच्यासह अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही…
आमदार लांडगे म्हणाले की, खेडचे माजी सभापती रामदासशेठ ठाकूर-पाटील यांनी घेतलेल्या ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा’ स्पर्धांचा हेतू हाच आहे की, शेतकऱ्यांचा आनंद टिकला पाहिजे. आपली परंपरा टिकली पाहिजे. शेतकऱ्यांचा हा खेळ उंचीवर नेण्यासाठी कोणी प्रयत्न करीत असेल, तर आम्ही सर्व बैलगाडा मालक, संघटना, बैलगाडा प्रेमी निश्चितपणे मदत करणार आहेत. स्पर्धेत अत्यंत सक्षमपणे नियोजन करण्यात आले. एवढ्या भव्य प्रमाणात शर्यती होत आहेत. त्यामुळे किरकोळ वाद होणे स्वाभाविक आहे. त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. या ठिकाणी कोणाताही पक्ष नाही. बैलगाडा हाच स्पर्धेत पक्ष असतो. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

काही टवाळखोरांनी गर्दीचा फायदा घेतला : गाडामालक रामनाथ वारिंगे
गाडामालक रामनाथ वारिंगे म्हणाले की, ज्यांच्या घरी बैलाचे एक शेपुटसुद्धा नाही, असे काही हौसे-गौसे स्पर्धा बघायला आले होते. काही टवाळखोर लोकांनी गर्दीचा फायदा घेवून आयोजक आणि आमच्या वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या आवाहनानंतर आम्ही माघार घेतली होती. मात्र, काही लोकांना हा वाद वाढवायचा होता. आता आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी केली. आमचा आयोजनकांवर कोणताही राग किंवा गैरसमज नाही. बैलगाडा शर्यतींना गालबोट लागू नये, अशीच आमची भावना आहे. गैरसमजातून झालेल्या वाद मिटला आहे. कोणाच्याही मनात क्लेश- राग नाही. काही समाजकंटक बैलगाडा शर्यत किंवा गाडामालकांची बदनामी सोशल मीडियावर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कारस्थानाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहनही वारिंगे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button