breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणे

महाराष्ट्र- कर्नाटक वाद ः पुण्यात ठाकरे गटाचा राडा, दोन्ही बाजूंच्या एसटी गाड्या बंद

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस अधिक चिघळत आहे. यात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव येऊन न देण्याचा इशारा देणाऱ्या कन्नड रक्षक वेदिका संघटनेने आता महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला आहे. यात महाराष्ट्रातील पाच ते दहा वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड वेदिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे. कर्नाटकातील हिरेबागेवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील वाहनांवर हा हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात नारायण गौडा यांनाही अटक केली आहे. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.

पुण्यात ठाकरे गटाचा राडा
कर्नाटकच्या या हल्ल्यामुळे आता महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, यावेळी बोम्मई यांनी महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातही आंदोलन झाले. पुण्यात आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर जात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासले आहे. यावेळी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. हे आंदोलन अधिक चिघळून नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेते.

दोन्ही बाजूच्या एसटी सेवा बंद
या घटनेनंतर आता महाराष्ट्र आणि कर्नाटक एसटी महामंडळ देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाने आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तर कर्नाटक एसटी महामंडळानेही महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बस सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादात महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी मंगळवारी कर्नाटकच्या बेळगावला भेट देण्याची घोषणा केली. मात्र यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदा आणि सुव्यवस्थेला धोका असल्याचे सांगितले मंत्र्यांना इथे येण्यापासून रोखा. अन्यथा महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आले तर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर मंत्र्यांचा प्रस्तावित दौरा पुढे ढकलण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button