महाराष्ट्र एकीकरण समिती ‘सिल्व्हर ओक’ वर!
मुंबई | प्रतिनिधी
कर्नाटक सीमाभागावर मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. समितीने आज सकाळी पवारांच्या मुंबईतील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ वर भेट घेतली. त्यावेळी समितीने कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. तसेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मदत देखील समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागितली आहे.
शरद पवारांकडे आपले गाऱ्हाणे मांडल्यानंतर पवारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला मदतीचे आश्वासन दिले आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेईल, त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन पवारांनी समितीला दिले आहे. त्यामुळे सीमाभागातील बांधवांच्या रक्षणासाठी शरद पवार महाराष्ट्रातील खासदारांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील आठवड्यात कर्नाटकची राजधानी बंगुळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर सीमाभागातील मराठी बांधव कर्नाटक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. तत्पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक करण्यात आली होती. अशा अनेक कारणांमुळे मराठी बांधव आणि कानडी प्रशासनात सातत्याने संघर्ष सुरू असतो. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचाही विचार करत आहे.