TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

जाहिरात फलक लावण्याचा महामेट्रोचा निर्णय; रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण होणार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या उन्नत मार्गिकांची कामे जवळपास झाल्याने मेट्रो मार्गिकालगत असलेल्या रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. सुशोभीकरणाचा आर्थिक ताण प्रशासनावर पडू नये, यासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. सुशोभीकरणाचे काम केल्यानंतर कंपनीला सुशोभीकरण केलेल्या जागेत दोन जाहिरात फलक लावण्याची मुभा देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या अंतरातील रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण होणार असून एका कंपनीला काम करण्याचे कार्य आदेश महामेट्रोकडून देण्यात आले आहेत. या माध्यमातून तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न महामेट्रोला मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

मेट्रोच्या दोन खांबांमधील अंतर साधारणपणे २५ ते ३० मीटर असून त्याची रूंदी २ ते २.२५ मीटर एवढी आहे. महापालिकेने जागोजागी रस्त्यांच्या दुभाजकांचे सुशोभीकरण केले आहे. त्याच पद्धतीने रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण नियोजित आहे. सुशोभीकरणाच्या कामाचा आर्थिक ताण मेट्रो प्रशासनावर पडू नये, यासाठी महामेट्रोकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय स्थानक या दरम्यानचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. दुभाजकांच्या सुशोभीकरणाबरोबरच तेथे दोन जाहिरात फलक लावण्याची मुभा कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकी व्यतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा दावा मेट्रोकडून करण्यात आला आहे.

शहराच्या महत्त्वाच्या चौकांमधील मेट्रो खांबांवर व्हर्टिकल गार्डनही विकसित करण्यात येणार आहे. दुभाजकांमधील झाडे आणि व्हर्टिकल गार्डनच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाच वर्षांपर्यंत कंपनीकडे राहणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते हॅरिस पूल आणि शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते रामवाडी या टप्प्यातील निविदा प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे मेट्रोचे एकूण ३३ किलोमीटर लांबीचे दोन मार्ग आहेत. यातील २५ किलोमीटर लांबीचा मार्ग उन्नत स्वरूपाचा आहे. हा मार्ग रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकांमध्ये उभारण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्याच्यामध्ये मेट्रो मार्गिकेचे खांब उभारण्यात आले आहेत. मेट्रो मार्गिकांची कामे सुरू असल्याने दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. मात्र आता उन्नत मार्गांचे काम जवळपास पूर्ण झाल्याने दुभाजकांच्या सुशोभीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button