breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : अंतर्गत बंडाळीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी खचली…भाजपा सुसाट सुटली !

प्रभाग रचना, आरक्षण जाहीर न झाल्यामुळे अनेकांचे प्रवेश बाकी

संकूचित प्रवृत्तीमुळे स्थानिक पातळीवर संघटनात्मक अपयश

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
स्थानिक पातळीवरील अंतर्गत बंडाळी, हेवे-दावे, मानपान, अहंकारी प्रवृत्ती यामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरती खचली आहे. याउलट, भाजपामध्ये मतभेद असतानाही संघटनात्मक काम जोरात सुरू आहे. परिणामी, आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. मात्र, अद्याप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झालेली नाही. त्यामुळे भाजपातून नाराज असलेले नगरसेवक राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत दाखल होण्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’लावलेली आहे. मात्र, तिकीटाबाबत ‘शब्द’ मिळालेला नाही, असे काही नाराजांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, २०२४ मधील विधानसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेवून भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि भाजपातील महत्त्वाकांक्षी इच्छुक दावेदार रणनिती आखत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या धडपडीत राष्ट्रवादीच्या स्थानिक ताकदीचे विभाजन होताना दिसत आहे.
मात्र, २०२४ मध्ये चिंचवड, भोसरी मतदार संघात भाजपाकडून आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे पुन्हा रिंगणात उतरणार हे निश्चत आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे पिंपरीत दोन्ही आमदारांनी लक्ष घातले आहे. याठिकाणी नवोदित चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, राष्ट्रवादीत नाराज असेलेला एखादा प्रभावी चेहरा भाजपाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतो, असाही अंदाज बांधला जात आहे.
स्थानिक राष्ट्रवादीतील कुरघोड्या आणि संकुचित वृत्तीमुळे भाजपाविरोधात वातावरण असतानाही महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अपशयाचा सामना करावा लागू शकतो. याचे चिंतन करण्याची आवश्यकता राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
भोसरीत काका- भाच्यात रस्सीखेच…
भोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी सूत्रे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्याकडे दिली आहेत. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे नाराज असल्याचे बोलले जाते. तसेच, भाजपाचे नाराज नगरसेवक रवि लांडगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास आगामी २०२४ मध्ये राष्ट्रवादीकडून विलास लांडे, अजित गव्हाणे आणि रवि लांडगे यांच्यात तिकीटासाठी संघर्ष होणार आहे. लांडे यांचा मतदार संघामध्ये मोठा प्रभाव आहे. पण, पक्षातील अजित गव्हाणे यांचे वाढता प्रभाव विलास लांडे आणि समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मीडियावर तसे चित्र स्पष्ट दिसत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत भोसरीत झालेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लांडे यांचे समर्थक सुनील लांडगे यांनी ‘‘भोसरीत कार्यक्रम राष्ट्रवादीचा अन् प्रचार भाजपा’’ अशा मथळ्याची बातमी व्हायरल केली. त्याला प्रत्त्यूत्तर म्हणून नगरसेवक अजित गव्हाणे यांचे समर्थक विनोद गव्हाणे यांनी ‘‘ सर्वसामान्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दलही राजकारण करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’’ अशा आशयाची बातमी व्हायरल केली आहे. त्यामुळे लांडे- गव्हाणे यांच्या नाराजीमुळे भोसरीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपाचे नाराज नगरसेवक रवि लांडगे, प्रियांका बारसे, संजय नेवाळे यांचे प्रवेश निश्चित मानले जात आहेत. मात्र, प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे कुणीही राजकीय भूमिका स्पष्ट केलेले नाही.

राहुल कलाटे यांचे वेट अँड वॉच…
चिंचवड विधानसभा मतदार संघात काहीही तशीच स्थिती आहे. भाजपा आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात आवाज उठवत शिवसेना गटनेते राहुल कलाटे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पण, अद्याप कलाटे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादीतील स्वपक्षाचे नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे यांच्यासह कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आणि शहराध्यक्ष संजोग वाघरे-पाटील हेसुद्धा चिंचवड विधानसभा लढवण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे कलाटेंच्या प्रवेशामुळे २०२४ मध्ये चिंचवडचे समीकरण बदलेल, अशी मानसिकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकांना राहुल कलाटे यांचा प्रवेश अस्वस्थ करणारा आहे. याउलट, शिवसेना आणि राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार की स्वतंत्रपणे यासह आरक्षण आणि प्रभाग रचना कशी होते? यावर राहुल कलाटे निर्णय घेतील, असा अंदाज आहे.
पिंपरीत बनसोडे, शिलवंत-धर अन् बहल यांचा संघर्ष…
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले आमदार अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदार संघातून राष्ट्रवादीच्याच नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इचछुक आहेत. दुसरीकडे, महापालिकेतील निविदा प्रक्रियेवरुन माजी महापौर योगेश बहल आणि नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या ‘कोल्ड वॉर’सुरू आहे. परिणामी, पिंपरी राष्ट्रवादीत बहल गट, बनसोडे गट आणि शिलवंत-धर गट असे गट उदयाला आले आहेत. दुसरीकडे, भाजपामधील नाराज नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज आहे. मात्र, प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची प्रतीक्षा असल्याने राष्ट्रवादीच्या पारड्यात अद्याप काही पडलेले नाही. सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास २०२४ मध्ये सावळे तिकीटासाठी दावा करणार आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभेतही आतापासून गट-तट आणि हेवे-दावे पहायला मिळत आहेत.
भाजपात मतभेद पण, रणनिती एक…
पिंपरी-चिंचवड भाजपामध्ये जुना, जगताप आणि लांडगे असे तीन गट आहेत. मात्र, गेल्या १५ दिवसांत लांडगे आणि जगताप यांच्या दोन महत्त्वपूर्ण बैठका झाल्या आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी एकत्र वसून भोसरी आणि चिंचवड मतदार संघातील संभाव्या उमेदवारांची यादीही निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनी मुलाखत दिली. त्यामध्ये जगताप- लांडगे यांच्या कसलाही मतभेद नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपा समर्थकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आतापर्यंत लांडगे आणि जगताप जोडीमध्ये वाद असल्याबाबतच्या चर्चा केवळ निष्फळ ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपाचे दोन्ही नेते कामाला लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button