breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : राष्ट्रवादी पुन्हा, पण कशी? : साहेबांच्या वाढदिवस नियोजन बैठकीला ३४ पैकी अवघे ४ नगरसेवक !

  • शहर राष्ट्रवादीतील पदाधिकारी- नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची गरज
  • भाजपा विरोधात वातावरण अनुकूल असतानाही हातातून सत्ता जाण्याची भिती

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ असा नारा देत सत्ता मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी बाह्या खेचल्या आहेत. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस (दि.१२) साजरा करण्यासाठी नियोजन बैठकीला पालिकेतील ३४ पैकी अवघे ४ नगरसेवक हजर राहीले. शहरात भाजपाविरोधी वातावरण आहे आणि राष्ट्रवादी निश्चितपणे पुन्हा सत्तेत येईल, असा दावा केला जात असतानाच पक्षाच्या नगरसेवकांचा कार्यक्रम आणि बैठकांबाबतचा उत्साह पाहता येत्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ पण कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पक्ष सत्तेत नसतानाही जीवंत ठेवला. शांत आणि संयमी असलेल्या वाघेरे-पाटलांना पक्षातील ‘‘पाटील-देशमुखांचा’’ मानसन्मान ठेवावा लागतो. जपावा लागतो. निमंत्रण- आमंत्रण द्यावे लागते. त्याचे सर्व सोपस्कार केल्यानंतरही नगरसेवकांना वेळ नाही, प्रमुख पदाधिकाऱ्यांना उसंत नाही, अशी स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, शरद पवार यांच्या वाढदिनी काय करायचे? असा प्रश्न उभा राहिला. त्यावर विचारमंथन करण्यासाठी अवघे ३ नगरसेवक उपस्थित राहिले, ही बाब चिंताजनक आहे.

सध्यस्थितीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: महाविकास आघाडी आणि राज्याचे ‘कारभारी’आहेत.  दुसरीकडे, भाजपाविरोधाची धारतीव्र झाल्यामुळे काही इच्छुक राष्ट्रवादीच्या माध्यमातून महापालिका सभागृहात जाण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र, राष्ट्रवादीत असलेल्या विद्यमान नगरसेवकांना पक्षाचे कार्यक्रम- उपक्रम याच्याशी काहीही देणे-घेणे नाही, असे चित्र आहे.

निवडणुकीचा आधार ; फक्त अजित पवार…  कसा होईल चमत्कार?

राष्ट्रवादीच्या नगरसदस्यांना शरद पवार यांच्यासाठी वेळ नसेल, तर शहरासाठी वेळ कसा काढणार? असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही सत्ताधारी भाजपाने राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना सत्तेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपाला आव्हान देण्याचे धाडस कोणी करीत नाही? आंदोलन, मोर्चाला अपेक्षीत प्रतिसाद  मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग, केवळ तिकीटासाठी राष्ट्रवादी हवी का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीची मदार केवळ अजित पवार आहेत. अजित पवार चमत्कार करतील आणि महापालिकेत पुन्हा सत्ता येईल, अशा भ्रमात राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत. मात्र, अजित पवार राज्याच्या राजकारात गुंतले आहेत. त्यांना उपलब्ध असलेला वेळ आणि कामाचा व्याप पाहता एकटे अजित पवार कोणताही चमत्कार करणार नाहीत, याचे भान पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने बाळगले पाहिजे.

स्थानिक नेत्यांनी विश्वासार्हता गमावली…

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचे प्रश्न सुटावेत. समस्या मार्गी लागाव्यात यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कार्यालयात स्वीय सहायकाला काम नेमून दिले. लोकांची कामे झाली पाहिजेत ही त्यामागील भावना होती. प्रत्येक सोमवारी अर्धा दिवस संबंधित व्यक्ती कार्यालयात बसून लोकांची कामे मार्गी लावत आहे. याचा उलटअर्थ असा होतो की, पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांकडे असलेली आपली विश्वासर्हता गमावली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार आणि राज्य सांभाळणाऱ्या अजित पवार यांना स्वत:चा स्वीय सहायक पिंपरी-चिंचवडमध्ये बसवावा लागतो हे येथील स्थानिक नेत्यांचे अपयश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवार यांच्यावर अवलंबून राहणाऱ्या इच्छुकांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रभागात, शहरात कामे केली पाहिजेत. लोकांमध्ये मिसळून कामाला लागले पाहिजे. मरगळ झटकली पाहिजे, अन्यथा भाजपा विरोधात वातावरण असतानाही राष्ट्रवादीला हाती सत्तासोपान लागणार नाही, हे मान्य करायला हवे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button