breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

लोकसंवाद : पिंपरी-चिंचवडच्या नव्या लढाईचे नवे शिलेदार अन् भाजपाची अपरिहार्यता!

प्रस्थापितांविरोधात संघर्ष करणाऱ्यांना पक्षश्रेष्ठींची ताकद
तुषार कामठे, रवि लांडगे, संदीप वाघेरे आदींना नव्या संधी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

‘‘विरोधी पक्षांतील प्रस्थापितांविरोधात संघर्ष करणे’’ हा भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीचा मूळ स्थायीभाव आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर भाजपाच्या सत्ताकाळात असे नव्या लढाईचे नवे शिलेदार त्वेषाने पुढे येत आहेत. त्यामुळे भाजपाची पाळेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खऱ्या अर्थाने रुजायला लागली आहेत, असे चित्र आहे.

भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकार परिषद घेत तब्बल ५५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका माजी महापौराचा यामागे वरदहस्त असल्याचे जाहीरपणे सांगण्याचे धारिष्ठ्य दाखवले. सामान्य पिंपरी-चिंचवडकरांकडून त्याचे स्वागतही होत आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय स्थित्यंतराची चाहूल लागलेली दिसत आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाचा विचार केला असता स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन, एकनाथ खडसे (आता राष्ट्रवादीत आहेत.) यांच्यापासून दुसऱ्या पिढीतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचे नेतृत्त्व पुढे आले किंबहूना राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण झाली.

मात्र, पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी-चिंचवडमध्ये २०१७ मध्ये भाजपा सत्तेत आली. पण, ‘‘सत्तेत भाजपा नाही’’अशी स्थिती होती. भाजपाचे दोन्ही आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचीच सत्ता खऱ्या अर्थाने महापालिकेत आहेत. हे दोन्ही नेते प्रस्थापित आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, या दोन्ही नेत्यांचे मूळ राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळत या नेत्यांना ताकद मिळाली. त्या ताकदीच्या जोरावर दोन्ही नेत्यांनी बलाढ्य राष्ट्रवादीशी दोनहात केले आणि सत्ताही मिळवली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे पण, सत्तेत भाजपा नाही, असे उपरोधिकपणे म्हटले जाते.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या मुद्यावर भाजपाने सत्ता मिळवली. पण, सत्ता उपभोगत असताना राष्ट्रवादीतील समविचारी नेत्यांना सत्तेतील अप्रत्यक्ष भागीदारी आणि ठेकेदारीत बरोबरीचा वाटा दिला. परिणामी, मूळ राष्ट्रवादीतून आलेल्या दोन्ही आमदारांकडून चुकीच्या कामांना विरोध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट, दोन्ही आमदारांच्या विरोधी भूमिका घेवून भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांना खुलेपणाने विरोध करण्याचे धारिष्ठ्य नगरसेवक तुषार कामठे, रवि लांडगे, संदीप वाघेरे, शितल शिंदे यासह नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे आदींनी दाखवले. किंबहूना दोन्ही आमदारांविरोधात आव्हान उभा केले. पिंपरी-चिंचवडमधील पारंपरिक राजकारणाला छेद देतहेच नव्या लढाईचे शिलेदार उद्याच्या पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करतील यात शंका नाही. त्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींना नाराज नगरसेवकांसोबत ‘कॉम्प्रमाईझ’केल्याशिवाय गत्यंतर नाही.
भाजपा पक्षश्रेष्ठींना हवे तेच झाले…

भाजपाचे राष्ट्रीय पक्षश्रेष्ठी यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अपेक्षीत असलेली रणनिती पिंपरी-चिंचवडमध्ये यशस्वी झालेली पहायला मिळते. दोन्ही आमदारांमुळे शहरात भाजपाची सत्ता आली असली, तरी भाजपाने आपल्या निष्ठावंत म्हणजे मूळ भाजपा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले नाही. किंबहूना आपला पायाभूत अजेंडा कायम ठेवला. भाजपाच्या सत्ताकाळात राज्यसभेवर अमर साबळे, महिला प्रदेश अध्यक्षपदी उमा खापरे, तर मोरेश्वर शेडगे, माउली थोरात, बाबू नायर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली. सरचिटणीस तथा प्रवक्ता अमोल थोरात यांच्याकडे तीन ते चार पदांचा कार्यभार आहे. सभागृह नेतेपदी एकनाथ पवार, नामदेव ढाके यांनी कारकीर्द गाजवली. नवनगर प्राधिकरण अध्यक्षपदी सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समितीवर ऍड. सचिन पटवर्धन, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपमहापौरपदी शैलजा मोरे आणि केशव घोळवे यांच्यासह क्रीडा समिती सभापतीपदी प्रा. उत्तम केंदळे, युवा मोर्चाचे अनुप मोरे यांच्यासह अण्णाभाऊ साठे महामंडळवर अमित गोरखे यांना संधी देवून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दोन्ही आमदारांना समांतर फळी उभी केली. आमदारांचा विरोध असतानाही निष्ठवंतांना ताकद दिली. कारण, भाजपाच्या ध्येय-धोरणानुसार सत्ता महत्त्वाची नसून, भाजपाची पाळेमुळे शहरात घट्ट होणे याला प्राधान्य देत नव्या-जुन्याचा समतोल राखण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे.
नाराजांची समजूत काढण्यासाठी भेटी-गाठी…?

२०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या सलग्न संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची जबाबदारी असलेले व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून नाराज नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. संबंधितांची भेट घेवून… तुमचा वाद आमदारांसोबत आहे. भाजपासोबत नाही… मग, पक्ष म्हणून आपण एकोप्याने निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे..’’ अशी अटगळ घातली जात आहे. निवडणूक घोषणा, प्रभाग रचना, आरक्षण यासाठी प्रतीक्षेत असलेली संभाव्य बंडखोरी अद्याप न होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. अन्यथा भाजपाचा आतापर्यंत सुरुंग लागला असता, अशी स्थिती आहे. वेळप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संबंधित नगरसेवकांसोबत ‘फेस टू फेस’चर्चा करणार आहेत. तसेच, प्रस्तापितांविरोधात लढणाऱ्यांना पक्षाकडून ताकद मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून ऐकायला मिळते.
राष्ट्रवादीतील प्रस्थापितांविरोधात लढणाऱ्यांचेही चीज होणार…

१५ वर्षे महापालिकेच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक प्रस्थापित निर्माण होणे, स्वाभाविक आहे. काहींनी भाजपाच्या जहाजात उडी मारली अन् काहींनी राष्ट्रवादीत राहून भाजपाशी हातमिळवणी केली. अशाच प्रस्थापितांविरोधात राष्ट्रवादीच्या नवोदित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रस्थापितांविरोधात एल्गार पुकारला. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, नगरसेवक पंकज भालेकर, मयूर कलाटे यांच्यासह शिवसेनेचे राहूल कलाटे यांनी प्रस्थापितांविरोधात रणशिंग पुकारले. वास्तविक, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनाही स्थानिक प्रस्तापितांचा वीट आला आहे. आगामी काळात राष्ट्रवादीला शहरात पाय भक्कम रोवायचा असेल, तर निश्चितपणाने प्रस्थापितांविरोधा संघर्ष करण्याचे धारिष्ठ्य दाखवणाऱ्या नवोदितांना ताकद द्यावी लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीसह भाजपामधील ‘गब्बर’ लोकांविरोधात दंड थोपाटणाऱ्यांचे राजकीय चीज होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button