breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेराजकारण

लोकसंवाद: खेड-आळंदी विधानसभेत ‘आप’ची धडक

  • प्रस्थापितांना धक्का : मयुर दौंडकर यांच्याकडून युवकांची मोर्चेबांधणी

। खेड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील युवकांची मोर्चेबांधणी करीत आम आदमी पार्टीकडून जोरदार धडक देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, प्रस्थापितांना धक्का मानला जात आहे.

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आम आदमी युवा आघाडीच्या पुढाकाराने ‘‘युवा संवाद’’ कार्यक्रम घेण्यात येणार आहे.त्यासाठी मतदार संघात सर्वत्र जोरदार ‘ब्रँडिंग’ करण्यात येत आहे. येत्या दि. ४ डिसेंबर रोजी चाकण येथील मिरा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असून, राज्यपातळीवरील ‘आप’ चे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
खेड-आळंदीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यासह भाजपाचे वर्चस्व आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मात्र केंद्रात, राज्यात आणि नगर परिषदेत सत्ते असलेल्या स्थानिक नेत्यांकडून अद्यापही सुटलेले नाहीत. परिणामी, मतदार संघातील युवकांच्या मनात असंतोष असून, सनदशीर मार्गाने नगरपरिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकाभिमूख कसा होईल? यासाठी ‘आप’ मैदानात उतरली आहे.
आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर म्हणाले की, राजकीय श्रेयवाद आणि इच्छाशक्तीअभावी अनेक प्रश्न रखडलेले आहेत. पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, अस्वच्छ आणि दूषित पाणीपुरवठा, कचरा समस्या, इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, मतदार संघातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी नाहीत, एमआयडीतील कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्या आहेत. यासह मतदार संघातील नागरिकांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रशासकीय गतीमानता आणि इच्छाशक्तीही दिसत नाही. याबाबत विचारमंथन करण्यासाठी हा ‘‘युवा संवाद’’ आयोजित केला आहे.

राष्ट्रवादी, सेना- भाजपाला आव्हान…
राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आहे. खेड- आळंदी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे. अशा परिस्थिती पुणे जिल्ह्यात प्रथमच आम आदमी पार्टी युवा आघाडीकडून ‘‘युवा संवाद’’ कार्यक्रम घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत असे दिग्गज मान्यवर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे खेड-आळंदी मतदार संघातील राष्ट्रवादीसह सेना-भाजपाच्या स्थानिक नेत्यांसमोर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’चे तगडे आव्हान उभे राहणार आहे.

मतदार संघात ‘आप’ नवा पर्याय…
खेड-आळंदी मतदार संघात सेना, राष्ट्रवादी आणि भाजपा असे सत्तेचे वर्तुळ दिसते. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आले आहे. राजकीय रस्सीखेचमध्ये मतदार संघातील नागरिकांपुढे ‘आप’ सारखा सक्षम पर्याय समोर येत आहे. ‘आप’ सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारांचा सुशिक्षित युवकांवर प्रभाव आहे. पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत यशानंतर ‘आप’ची प्रतिमा जनमानसात ‘प्रस्थापितांना प्रभावी पर्याय’ अशी झाली आहे. त्यामुळे खेड-आळंदीत नव्या उमेदीने कामाला लागलेल्या ‘आप’ला जनाधार मिळेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button