Lok Sabha Election 2019 Voting LIVE Updates: जास्त मतांनी विजयी होणार याची खात्री – नितीन गडकरी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११ हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून तीन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.
प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारली असून त्यांच्याऐवजी नाना पंचबुद्धे यांना रिंगणात उतरवले आहे.