breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: जवानाने बजावलं मुलाचं कर्तव्य! आईच्या अंत्यसंस्कारासाठी ११०० किमीचा खडतर प्रवास

करोना व्हायरसच्या या संकट काळात पोलीस, डॉक्टर, नर्सेस, आणि जवान एकाबाजूला आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक जबाबदाऱ्याही निभावत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही लॉकडाउनमुळे अनेक अडथळयांचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगड सशस्त्र बल (सीएएफ) मध्ये तैनात असलेला एक जवान १,१०० किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास करुन आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचला.

छत्तीसगडमधल्या बीजापूरमधून उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला तब्बल तीन दिवस लागले. मूळचे उत्तर प्रदेश मिर्जापूरचे असणारे संतोष यादव (३०) छत्तीसगड सीएएफमध्ये नोकरीला आहेत. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर संतोष पायी चालत निघाले. त्यानंतर मालगाडी आणि नाव असा तब्बल १,१०० किलोमीटरचा खडतर प्रवास करुन ते सीकर या आपल्या मूळगावी पोहोचले. त्यांना घरी पोहोचायला तीन दिवस लागले.

चार एप्रिलला संतोष यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली. दुसऱ्याच दिवशी वाराणसीमधील एका रुग्णालयात संतोष यांच्या आईचा मृत्यू झाला. संतोष सात एप्रिलला सकाळी गावी जाण्यासाठी पायीच चालत निघाले.

“आईच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर काहीही करुन मला माझ्या गावी पोहोचायचे होते. माझा छोटा भाऊ आणि बहिण दोघे मुंबईमध्ये राहतात. लॉकडाउनमुळे गावी पोहोचणे त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत मी माझ्या वडिलांना एकटे सोडू शकत नव्हतो” असे संतोष यांनी सांगितले.

“काहीही करुन मला छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचायचे होते. जगदलपूर गाठण्यासाठी मी बीजापूरवरुन धान्य वाहून नेणाऱ्या एक ट्रकचालकाकडे लिफ्ट मागितली. रायपूरपासून २०० किमी अंतरावर कोंटागावमध्ये मी मिनी ट्रकची दोन तास वाट पाहिली. पोलिसांना मी माझी परिस्थिती सांगितली. पोलिसांनी औषधे घेऊन जाणाऱ्या एका वाहनामधून रायपूरपर्यंत पोहोचण्यासाठी माझी मदत केली. रायपूरमधून आरपीएफमधील एका मित्राच्या मदतीने माझी मालगाडीमध्ये व्यवस्था झाली. १० एप्रिलला सकाळी उत्तर प्रदेशातील चुनार येथे पोहोचलो. त्यानंतर गंगेतील नावेमधून प्रवास करत गावी पोहोचलो” असे संतोष यादव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button