breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

सत्ताधारी भाजपावर ‘लेटर बॉम्ब’: नगरसेवक तुषार कामठे म्हणतात…दोन्ही आमदारांच्या हुकूमशाहीमुळे निवडणुकीत फटका बसणार!

  • प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार
  • भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांनाच महापालिका निवडणुकीत संधी देण्याची मागणी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

भाजपा आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीसाठी अत्यंत चुरशीची असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्थानिक ‘डिसिझन मेकर’ असलेले शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे  आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराज नगरसेवक तुषार कामठे यांनी लेखी तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठींना पाठवलेल्या पत्रात कामठे यांनी म्हटले आहे की, येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. पण, गेल्या ५ वर्षांमध्ये शहरातील भाजपाचे दोन आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

भाजपाच्या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित आहे. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुक तिकीटवाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपाच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी नगरसेवक कामठे यांनी केली आहे.

आमदार पक्ष सोडतील, पण मी नाही : कामठे

राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू  आहे. पण] मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे, तर भाजपाचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात. पण मी भाजपाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील परंतु नवीन कार्यकर्ता केव्हाही पक्ष बदलू शकत नाही, असा दावाही नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button