breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

विधान परिषद निवडणूक : भाजपाने करुन दाखवले, राष्ट्रवादीने केवळ झुलवले!

  • पक्षश्रेष्ठींकडून लांडे, पानसरे, बहल अन्‌ वाघेरेंच्याही हातावर तुरी
  • २५ वर्षांतील सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडकरांच्या पदरी निराशा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पक्षाच्या स्थापनेपासून सुमारे २५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेत्यांना महामंडळ किंवा राज्यमंत्री दर्जाचे पद मिळाले नाही. मात्र, पाच वर्षे सत्ता दिलेल्या भाजपाने पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक महत्त्वाची पदे दिली. त्यामुळे ‘स्थानिक नेतृत्त्वाला ताकद’ देण्याच्या मुद्यावर ‘‘भाजपाने करुन दाखवले, पण राष्ट्रवादीने केवळ झुलवले’’ अशी खंत राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त केली जात आहे.

राज्यात राज्यसभा, विधान परिषद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीची रस्सीखेच सुरू असतानाच विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजपाने पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यापैकी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या उमेदवारीमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पक्षाच्या निष्ठावंत म्हणून  खापरे यांना पहिल्यांदा प्रदेश महिला अध्यक्षा आणि आता विधान परिषदेवर संधी देण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या स्थानिक नेत्यांच्या पदरी गेल्या २५ वर्षांपासून केवळ निराशा पडली आहे. माजी महापौर आझम पानसरे यांचा अपवाद वगळता माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांना विधान परिषद अथवा महाविकास आघाडी सरकारमध्ये एखाद्या महामंडळावर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.

याउलट, राज्यसभा खासदारपदी अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीवर (राज्यमंत्री दर्जा) ॲड. सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशीव खाडे, उपमहापौरपदी शैलजा मोरे, केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार, नामदेव ढाके, स्थायी समितीवर विलास मडिगेरी यांसह विविध समिती, प्रदेश कार्यकारिणीवर भाजपाने शहरातील अनेकांना संधी दिली. यातून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी काहीच बोध घेतला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सक्षम स्थानिक नेतृत्त्वाअभावी महापालिका विजय कठीण…

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये राष्ट्रवादीमुक्त शहर झाले. शहरातील तीन विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षाने वर्चस्व ठेवले. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०१९ मध्ये पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळाले. मात्र, चिंचवड आणि भोसरीत अधिकृत उमेदवारही देता आला नाही. शहर राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर गट-तट निर्माण झाले आहेत. संपूर्ण शहराचे नेतृत्तव करु शकेल, असा एकही स्थानिक चेहरा समोर आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे असताना प्रदेश नेतृत्त्वाने स्थानिक नेतृत्त्वाला ताकद देणे अपेक्षीत आहे. अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला विजय कठीण होणार आहे.

प्रदेश भाजपाचे पिंपरी-चिंचवडमध्ये बारीक लक्ष…

विविध विकासकामांच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच शहराचा दौरा केला. यावेळी भाजपाच्या प्रदेश नेतृत्त्वाचे शहरात लक्ष नाही. मात्र, आम्ही शहरात कायम येतो. विकासकामांत लक्ष असते, असे जाहीरपणे सांगितले. मात्र, भाजपाचे प्रदेश पातळीवरील नेत्यांची शहरात उठबस वाढली आहे. त्यामुळेच भाजपामधील स्थानिक नेतृत्त्वावर प्रचंड नाराज अससेला २५ ते ३० लोकांचा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असे जाहीरपणे सांगितले जात असतानाही अद्याप यश येताना दिसत नाही, यावर राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्त्वाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button