breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडच्या तोंडाला पाने पुसली?

  • विलास लांडे, संजोग वाघेरे, योगेश बहल यांना डावलले
  • आगामी महापालिका निवडणुकीत फटका बसणार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम घुमू लागले आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवडमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वाला राज्य पातवळीवर संधी देणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. विधान परिषद निवडणुकीत संधी असतानाही पक्षाचे दुर्लक्ष केले, असा संदेश आता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे.

राज्य विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. विधान सभेतील संख्याबळानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला २ जागा आल्या आहेत. या जागेवर रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्याबाबत शेवटपर्यंत चूरस होती. अखेर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी निंबाळकर आणि खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे आणि योगेश बहल यांनी विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. या तिघापैकी एकाला संधी मिळाली असती, तर प्रतिस्पर्धी भाजपाला आव्हान देणे सोपे झाले असते.

सध्यस्थितीला पिंपरी विधान सभेतून आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य आहे. मात्र, पिंपरीशिवाय भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडे प्रभावी स्थानिक नेता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता २०१९ मध्ये राज्यात आली. त्यावेळीपासून शहरातील स्थानिक नेते महामंडळ, राज्यमंत्री अथवा विधान परिषदेसाठी डोळे लावून बसले आहेत. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालीच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणुका लढवल्या जाणार आहे. स्थानिक नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे पक्षश्रेष्ठींकडून विश्वास टाकला जात नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

माजी आमदार लांडे ‘नरो वा कुंजरो वा’ च्या भूमिकेत…?

आजच्या घडीला माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता आहे. संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:ची ओळख असलेला राष्ट्रवादीचा हा प्रभावी चेहरा आहे. मात्र, लांडे यांच्यावर पक्षनेतृत्त्वाकडून विश्वास दाखवला जात नाही. १० वर्षे आमदार राहिलेले लांडे म्हणजे पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ आहेत.  प्रचंड अनुभव आणि मुत्सद्दी नेता असतानाही पक्षातून ताकद दिली जात नाही. त्यामुळे लांडे आगामी निवडणुकीत ‘नरो वा कुंजरो वा’ च्या भूमिकेत राहिले, तर राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

योगेश बहल यांची निवृत्तीच्या दिशेने वाटचाल…

पक्षाच्या स्थापनेपासून योगेश बहल पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेवून मिरवत आहेत. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, महापौर आणि शहराध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे बहल गेल्या ३० वर्षांपासून महापालिका सभागृहात आहेत. आता त्यांना बढतीची संधी देणे अपेक्षित होते. अभ्यासू, अनुभवी आणि स्थानिक राजकारणाला फाटा देवून राष्ट्रवादीच्या जहाजाचे सारथ्य करण्याची क्षमता असलेला हा नेता पक्षश्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळे निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कारण, बहल यांनी त्यांचे चिरंजीव विरेंद्र बहल यांना महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली असल्याचे बोलले जाते.

संजोग वाघेरे यांची राजकीय कोंडी…

शांत, संयमी आणि राष्ट्रवादीची धुरा पडत्या काळात सांभाळणारे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना शहराध्यक्षपदावरुन हटवण्यात आले. वास्तविक, त्यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र, राजकीय चढओढीत त्यांना एखाद्या चांगल्या पदावर संधी देणे अपेक्षीत होते. कारण, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वाघेरे यांना मतदार संघ नाही. कारण, पिंपरी मतदार संघ आणखी किमान २०२९ पर्यंत अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून वाघेरे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना पक्षाने माघार घ्यायला लावली. आता विधानसभेसाठी मतदार संघ नाही, प्रामाणिकपणे काम करुनही पक्ष चांगल्या पदावर संधी देत नाही… अशी अवस्था संजोग वाघेरे यांची झाली. वाघेरे यांची आता तिसरी पिढी राजकारणा सक्रीय झाली असून, नवोदितांना संधी मिळवण्यासाठी वाघेरेंची राजकीय कोंडी झालेली असतानाही पक्षाकडून अपेक्षीत साथ मिळत नाही, अशी स्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button