Ganesh Chaturthi | गणेश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या..
Ganesh Chaturthi 2024 | हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात १० दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीला शुभ मुहूर्त आणि इतर तपशील जाणून घ्या..
गणेश चतुर्थी पूजा मुहूर्त –
असे मानले जाते की, भगवान गणेशाचा जन्म मध्यान्हाच्या वेळी झाला होता, म्हणून मध्यान्हाची वेळ गणेशपूजेसाठी सर्वात योग्य मानली जाते. पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०३ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३३ मिनिटापर्यंत असेल. पूजेचा एकूण कालावधी २ तास ३१ मिनिटे आहे.
चतुर्थी तिथी प्रारंभ आणि समाप्ती –
पंचांगानुसार, चतुर्थी तिथी ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ०१ मिनिटे ते ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील.
हेही वाचा – बाल विवाह निर्मुलनाकरीता दिपा मुधोळ-मुंडे यांना स्कॉच संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
गणेश चतुर्थीच्या पूजेचे साहित्य –
वाती (समईसाठी आणि तुपात भिजवलेल्या), फुलवाती तुपात भिजवलेल्या, कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य दही आणि दुध, गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, चौरंगावर ठेवण्यासाठी आसन, रांगोळी, रांगोळीचे रंग, समई, समईसाठी वाती, निरांजन (२), निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती, आरती करण्यासाठी पंचारती, आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्तीचे घर/ स्टॅंन्ड, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने – २५ नग, सुट्टे पैसे (नाणी १०), सुपाऱ्या, खारीक, बदाम, हळकुंड,फळे, खोबऱ्याचे तुकडे (प्रत्येकी ५ नग), नारळ, नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या, आंब्यांचे डहाळी , पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षदा, प्रसादाकरिता मोदक आणि इतर नैवेद्य, मिठाई.
गणेश विसर्जन २०२४ कधी?
गणेश उत्सव किंवा गणेशोत्सव १० दिवस चालतो. काहीजण आपल्या परंपरेनुसार १, दीड, ३, ५, ७ दिवसही गणपती बसवतात. परंतू १० दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. या दिवसाला गणेश विसर्जन असेही म्हणतात. यावर्षी गणेश विसर्जन १७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवारी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक बाप्पाला निरोप देतात. तलाव किंवा नदीत गणपतीची मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे.