दोन्ही ठाकरे बंधूंचे जमेना, एकमेकांवाचून करमेना !

कोणतीही निवडणूक आली, की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चांना अक्षरशः उधाण येते. प्रत्यक्षात, दोघे एकत्र येऊन चर्चा करत नाहीत, ही खरी डोकेदुखी आहे. दोघांनी एकत्र येण्याच्या चर्चा एकीकडून संजय राऊत आणि दुसरीकडून संदीप देशपांडे करताना दिसतात. अर्थात्, प्रत्यक्ष सकारात्मक न बोलता दोघेही फक्त एकमेकांच्या कागाळ्या काढण्यात पटाईत आहेत, तो भाग वेगळा !
मुंबई महापालिका डोळ्यासमोर..
सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने डोळ्यासमोर आहे ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ! ही महानगरपालिका हातात असली म्हणजे बाकी काहीही नको, अशी एक अटकळ खेळली जाते. अनेक राज्यांपेक्षा मुंबई महानगरपालिकेचे बजेट जास्त आहे, भरपूर काम करायला वाव आहे आणि इतर उचापतींसाठी मोठा ‘स्कोप’ देखील आहे हे सर्वांना माहीत आहे.
मुंबईसाठी काय पण..
मुंबईमध्ये निवडणूक जिंकणे सोपे आहे, असे ठाकरे घराण्याला वाटते. त्याचे कारण पूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश द्यायचा आणि मुंबईकरांनी म्हणजेच पर्यायाने मराठी माणसाने धपाधपा मते टाकायची, हे समीकरण होते. तोच कित्ता पुन्हा गिरवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे जाणकारांना वाटते आणि म्हणून त्यांचेही प्रयत्न सुरू असावेत.
पुलाखालून बरेच पाणी गेले..
राजकारणाच्या मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे. शिवसेनेचे तुकडे झाले असून छोटा तुकडा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मोठा तुकडा भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाला आहे. याच काळात राज ठाकरे यांचे राजकीय वजन पूर्णपणे संपल्यात जमा आहे. राजकारणामध्ये ‘महायुती’ चे तिन्ही पक्ष मोठ्या ताकतीने आपले अस्तित्व टिकवून आहेत, तर ‘महाआघाडी’ तील तीनही पक्ष अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी त्यांची वाटचाल आहे !
राज ठाकरे यांचे नक्की काय ?
महा नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलण्यात तरबेज आहेत. आपल्या भाषणांनी त्यांनी अनेकांना दुखावले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनाही त्यांनी वेळोवेळी सुनावले आहे. भाजपला विरोध, पण मोदींना पाठिंबा, जातीयवादी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध पण अजित, शरद पवारांना पाठिंबा अशा काहीतरी कोलांटउड्या ते नेहमी घेत असतात, हे देखील आता लपून राहिले नाही.
दोन्ही ठाकरेंची विश्वासार्हता ?
आता मूळ मुद्द्याचा प्रश्न असा आहे की उद्धव आणि राज या दोन्ही भावांची विश्वासार्हता काय? हा प्रश्न जनता विचारत आहे. दरवेळी बदलणारी भूमिका हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे. तर भाजपा बरोबर निवडणूक लढवून ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्या दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचा प्रसंग उद्धव ठाकरे यांना आयुष्यभर भोवणार आहे. थोडक्यात, दोघांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह आहे.
‘मनसे’ बरोबर युतीसाठी ‘दिलसे’ तयार..
उद्धव गट आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या तेव्हापासून आपला गट मनसेसोबत युती करायला पूर्णपणे सकारात्मक आहे, असे उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत सांगत आहेत. मराठी माणसासाठी मनसे सोबत एक पाऊल पुढे टाकायला दिलसे तयार असल्याचे ठाकरेंच्या गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दुधा ने दोनदा तोंड पोळलेली मनसे ताकसुद्धा फुंकून पिताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा थोडक्यात सांगायचे झाले तर ‘बाजारात तुरी…’
टाळी देण्यासाठी मुहूर्त कोणता?
ठाकरे बंधू तयार आहेत, पण टाळी देण्या-घेण्यासाठी टायमिंग जुळणार का? संजय राऊतांचे नेहमीचे तिरकस बोलणे ऐकले की असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाहीत, हा एक वेगळाच भाग आहे. दोन्ही ठाकरेंचे पक्ष स्वतःला मराठी माणसाचा उद्धार करणारे पक्ष समजतात. मराठी माणसासाठी सर्वकाही बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे संजय राऊत अनेकदा सांगून गेले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, की उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमच्या सगळ्यांची चर्चा झाली. मनसे संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी मनसे दिलसे ही भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे, सर्व पक्ष, आम्ही सगळे राज ठाकरे यांच्यासोबत नाते जोडायला पूर्णपणे सकारात्मक आहोत. महाराष्ट्राच्या जनतेचे दोघांवरती भावनिक आणि राजकीय प्रेशर आहे, असे दोन्ही ठाकरेंनाही वाटते.
हेही वाचा – भाजप महिला मोर्चाचा चौंडीला विशेष भेट दौरा
ठाकरे ब्रँड संपणार नाही…
राज ठाकरे स्पष्ट बोलतात, पण उद्धव ठाकरे यांचे बोलणे नेहमीच संभ्रमात टाकणारे असते. त्यामुळे दोघे केव्हा? कधी? आणि कुठे? एकत्र येणार, हे मात्र समजण्यापलीकडची गोष्ट झाली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली. मात्र, याचा पुढचा अध्याय सुरु व्हायच्या आतच ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर गेले. मायदेशी परत आल्यानंतर सुद्धा युती च्या चर्चेची गाडी काही पुढे गेलीच नाही आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढला गेला, अशी सारवासारव राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केली. त्यामुळे आधीच्या गोंधळामध्ये आणखी भरच पडली. ठाकरे ब्रँड संपवायला सुद्धा काहीजण निघाले आहेत, मात्र तो ब्रँड संपणार नाही, असा राज ठाकरे यांनी दिलेला इशारा कोणासाठी होता, हे सुद्धा समजू शकले नाही.
नवीन नाती जोडायची का तोडायची ?
संजय राऊत हे सकारात्मक बोलत आहेत, पण मनसेकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही. पडद्यामागे ना पडद्यापुढे.. आमची कुठलीही सध्या बोलणी चालू नाहीत. आम्हाला कुठलेही पत्र आले नाही. ठाकरे गटाकडून कुठले ही अधिकृत असे बोलावणे नाही. या आधी जेव्हा आम्हाला युती करायची होती, तेव्हा आम्ही एक रितसर माणूस पाठवला होता. यांना नवी नाती जोडायची, की दुसरी असलेली नाती तोडायची आहेत ? असा प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
शंका कुशंकांनी भरलेली मनसे..
यापूर्वीचा, अनुभव पाहता उद्धव ठाकरे आपल्याला शेवटपर्यंत झुलवत ठेवतील, अशी शंका मनसेला वाटते. तसे झाले तर ना महायुती, ना मविआ अशी त्रिशंकू स्थिती होईल, अशी भीती मनसेला सतावत असेल,तर ते पूर्णपणे चुकीचे नक्कीच नाही. उबाठा आणि मनसेच्या युती संदर्भात एकीकडे मनसेकडून तसा सावध पवित्रा घेतला जात असताना किंवा कुठल्याही प्रकारे स्पष्ट भूमिका मांडली जात नसताना ठाकरेंच्या गटाकडून मात्र पूर्णपणे सकारात्मक भूमिका ‘युती’ संदर्भात मांडली गेली आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवकाश आहे. त्यामुळे या नुसत्या चर्चेनंतर प्रत्यक्षात काही घडामोडी घडतात का? यावर राज्यातील राजकारण अवलंबून असणार आहे.
मनसेचा ओढा ‘महायुती’ कडे?
उद्धव ठाकरे यांची एकूण विश्वासार्हता आणि राजकीय भूमिका पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ओढा महायुतीकडे आहे हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या राज ठाकरे यांच्याबरोबर होणाऱ्या गाठीभेटी आणि चर्चा कशासाठी? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, असे वाटत नाही.. मराठी माणसाला पण.. आणि त्या दोघांना पण!