‘पुरूषांनी शर्ट काढून मंदिरात जाणे वाईट प्रथा, ती आता थांबवली पाहिजे’; शिवगिरी मठाच्या प्रमुखांची मागणी

Swami Sachidanand | पुरूषांनी वरचे कपडे (शर्ट) काढून मंदिरात जाणे वाईट प्रथा असून, ती आता थांबवली पाहिजे, अशी मागणी केरळमधील शिवगिरी मठाच्या प्रमुखांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पाठिंबा दर्शवला आहे. स्वामी सच्चिदानंद हे समाजसुधारक श्रीनारायण गुरु यांनी स्थापन केलेल्या शिवगिरी मठाचे प्रमुख आहेत.
स्वामी सच्चिदानंद नेमकं काय म्हणाले?
शिवगिरी मठात दरवर्षी होणाऱ्या यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वामी सच्चिदानंद म्हणाले, ही एक वाईट प्रथा आहे. पूर्वी, ही प्रथा (वरचे वस्त्र काढून मंदिरात जाणे) पुनूल (उच्च जातीच्या लोकांनी परिधान केलेला पवित्र धागा) दिसावा यासाठी सुरू करण्यात आली होती. ती प्रथा आजही मंदिरांमध्ये सुरू आहे. ती प्रथा बदलली पाहिजे, अशी श्रीनारायण समाजाची इच्छा आहे. ही वाईट प्रथा आहे यात शंका नाही. श्री नारायण मंदिरांमध्ये ही प्रथा अस्तित्वात नाही. या संदर्भात बदल करणे आवश्यक आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलंय? संजय राऊतांचा आरोप
या यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनदेखील उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, स्वामींनी जे मत मांडले त्यामुळे मोठी सामाजिक क्रांती होऊ शकते. स्वामींनी गुरूंची उदात्त परंपरा कायम ठेवणारे मत व्यक्त केले आहे. मला खात्री आहे की, अनेक मंदिरे याचे पालन करतील. कोणावरही सक्ती करण्याची गरज नाही. काळाच्या अनुषंगाने अनेक पद्धती बदलल्या आहेत हे वास्तव आहे. श्रीनारायण चळवळीशी संबंधित मंदिरांनी तो बदल स्वीकारला आहे. मला आशा आहे की इतर मंदिरे देखील हा मार्ग अवलंबतील.




