साेलापूर जिल्ह्यातील २ लाख विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाइन
बस रद्द, उशिरा आल्यास थेट तक्रार, काय आहेत नियम?
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी रोज एसटी बसमधून ये-जा करतात. विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात अडचण आल्यास त्यांना आता थेट मदत मागता येणार आहे. बस वेळेवर आली नाही, रद्द झाली, अशावेळी विद्यार्थ्यांना हेल्पलाईनवरून मदत मागता येणार आहे. यासाठी महामंडळाने १८००२२१२५१ हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केला आहे.
विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी देखील विभाग नियंत्रकांना संपर्क करून समस्या मांडू शकतात. बस उशिरा सुटणे किंवा अचानक रद्द झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तास चुकतात, परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाहीत. अशा वेळी नुकसानीला संबंधित आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षक जबाबदार धरले जाणार आहे.
हेही वाचा – “मुंबईत कधीही असुरक्षित वाटलं नाही”; कॅनडामधील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया
जितके दिवस नुकसान; तितके दिवस अधिकारी निलंबित
ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असते, अशा थांब्यावर आगार पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा बसमधून घरी जाईपर्यंत पर्यवेक्षकांनी हालू नये. गैरव्यवस्थापनामुळे नुकसान झाल्याची तक्रार आल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस जबाबदार पर्यवेक्षक किंवा संबंधित अधिकारी निलंबित होईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
शाळा सुटल्यावर तासात विद्यार्थी जावा घरी
शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. संध्याकाळच्या वेळी शाळा- महाविद्यालय सुटल्यानंतर किमान तासात मुले त्यांच्या घरी पोचावेत. बस वेळेवर न आल्याने मुलांना घरी पोचण्यास उशीर होतो. या पार्श्वभूमीवर हेल्पलाइन उपयुक्त आहे.




