सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील एक नवीन प्रकरण समोर आणले
मिल चालू करण्यासाठी सावकारांकडून काही लोन घेतलं, सावकारांनी त्यांना इतका छळलं की त्यामधील एक भाऊ घर सोडून निघून गेला

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी विविध धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील एक नवीन प्रकरण समोर आणलं आहे. बीडमधील बोबडे कुटुंबाप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आता याप्रकरणी मी लवकरच न्याय मागणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
अंजली दमानिया यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख प्रकरणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संतोष देशमुख यांच्या प्रकरणांमध्ये मला आत्ताच्या घडीला अनेक गोष्टी या झालेल्या दिसत नाही. या गोष्टींची चर्चा काल मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांच्याबरोबर सुद्धा केली. सुदर्शन घुले याचा जो कबुली जबाब आलेला आहे. तो कसा अर्धवट आहे, त्याच्यात काय काय गोष्टी नाहीत, कारण त्यामध्ये फक्त हत्या होईपर्यंतच लिहिलेला आहे. हत्या झाल्यानंतर ते जे फरार झाले, तेव्हा ते फरार कुठे झाले? ते भिवंडीला कसे पोहोचले, त्या ठिकाणाहून पुण्याला कसे आले आणि कोणी आर्थिक मदत केली? कराडसोबत त्याचं बोलणं झालं की नाही? या कुठल्याच गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
अर्धवट कबुली जबाब जो घेतला. पोलिसांनी काय ग्राउंडवर घेतला गेला. याव्यतिरिक्त हे जे शिवलिंग मोराळे आहेत, बालाजी तांदळे आहे, डॉक्टर वायबसे आहेत यांच्याबद्दल चकारही शब्द त्या चार्जशीट मध्ये लिहिलेला नाही. इतकच नाही तर ते जे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. त्यांच्याबद्दलही चकार शब्द त्यामध्ये नाही. त्यामुळे या अनेक गोष्टी ॲडिशनल चार्जशीट मध्ये येण्याची गरज आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
हेही वाचा – ‘जीआयएसद्वारे सर्व्हे करून दर तयार करा’; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अंजली दमानियांकडून पोलखोल
“काल मी जेव्हा जालन्यात आले, तेव्हा मला बीडवरून एक अख्खं कुटुंब भेटायला आलं होतं. बोबडे नावाचे कुटुंब होतं. त्यामध्ये त्यांची दोन मुलं मंगेश आणि बजरंग यांनी एक राईस मिल चालू करण्यासाठी सावकारांकडून काही लोन घेतलं होतं. परंतु ही राईस मिल चालू झाल्यानंतर कोविड काळात त्यांना लॉस झाला. परंतु त्या सावकारांनी त्यांना इतका छळलं की त्यामधील एक भाऊ घर सोडून निघून गेला आणि दुसऱ्या भावाला इतका त्रास दिला की भाऊबीजेच्या दिवशी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी त्याने एक मृत्यूपत्र लिहून दिलं होतं. त्यामध्ये या सगळ्यांची सरळ सरळ नावं लिहिली असतानाही कुठल्याही प्रकारची कारवाई त्यावर आजपर्यंत झाली नाही. पोलिसांनी त्यात काहीही कारवाई केली नाही म्हणून तो त्रास त्यांना झाला असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बीडला जाणार आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांसोबत बोलून आणि त्यांना सांगून ती कारवाई करून घेणार आहे”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं
“बीड जिल्ह्यातील एमआयडीसीचा जो भाग आहे, त्या भागातील हे प्रकरण आहे. हे सगळेच्या सगळे राजकारणी आहे तिथले जे सावकार आहेत. ते त्या ठिकाणच्या राजकारणात आहे आणि धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं आहेत. त्यापैकी एक माणूस हा ठाकरे गटाचा आहे”, असं अंजली दमानिया यांनी म्हटले.