अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे.

प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते; भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही ? जगामध्ये पाहताना कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे, असे आपल्याला का बरे दिसत नाही? अशी अवस्था असायला काय कारण असावे ? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते. भगवंताचे भजन-पूजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ? ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर, आम्हांला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही.

भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे, असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसा-अडका असावा, बायको-मुले असावीत, शेतीवाडी, नोकरी-धंदा, इतर वैभव असावे आणि त्याचबरोबर भगवंतही असावा असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच, असे आम्हांला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज, प्रपंचात आम्हांला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो, पण इतका प्रपंच करूनही आम्हांला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर, एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हांला सुख देत नाही, हे अनुभवाला येऊनसुद्धा तो टाकावा असे आम्हांला वाटत नाही. प्रपंचात आम्हांला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे.

हेही वाचा –  शिवाजीनगर न्यायालयात ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेचा प्रत्यय, अपंग शेतमजूर महिलेसाठी न्यायाधीश दोन मजले उतरुन आले खाली

प्रपंच आम्हांला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले, आणि हा निश्चय एकदा दृढ झाला, म्हणजे मग भगवंताची गरज आम्हांला भासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग, परिस्थिती वगैरे काहीही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरल्यावर, त्याचे प्रेम आम्हांला यावे असे आपल्याला वाटू लागेल, आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल ? भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे; दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे; आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यांपैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा.

बोधवचन:- भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button