अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक

ईश्वर सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे, रक्षणकर्ता आहे, तसेच संहारकर्ताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो नि:स्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे नि:स्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर-प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला ? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम, नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये.

एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि नि:स्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा, भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे. उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण, मोरी झाडत बसला ! असे आमुचे चुकते. थोडक्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार ? म्हणून, ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरिता गुरु-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे.

हेही वाचा –  पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना

आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले ? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक असे म्हणतात की, “विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे.” हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये.

बोधवचन:- भगवत्प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे; म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button