अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

शाश्वतचे सुख कसे लाभेल ?

असे पहा, एखादा प्रवचन करणारा घ्या, किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही.

पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, “ देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे. ” मी त्याला विचारले, “ असे झाले तरी काय ? ” त्यावर तो म्हणाला, “ मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले!” मी त्याला विचारले, “ मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ? ” त्यावर तो म्हणाला, “ मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील. ” तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमधील ‘‘इको टुरिझम पार्क’’ च्या कामाला गती!

प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. याउलट, देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.

खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान् लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.

बोधवचन:- जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार; भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button