Sangali: गरिबांना धान्य मिळेना: ‘रेशन’साठी आम आदमीचा आंदोलनाचा इशारा
तहसीलदार शामल खोत यांना निवेदन : जिल्हा अध्यक्ष राम पाटील यांची मागणी
शिराळा : अन्न-धान्य पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही. जनतेसोबत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उभी असेल. गोरगरिब नागरिकांना रेशन धान्य पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष राम पाटील यांनी दिला आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने शिराळा तालुक्यामध्येमध्ये रेशन धान्य मिळत नसल्याबाबत तहसीलदार शामल खोत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केशरी/ पिवळे रेशन कार्ड ऑनलाइन करून लाभार्थींना रेशन धान्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णाजी कदम, बाबासो पाटील, महादेव पाटील आणि आणि मोठ्या संख्येने तालुक्यातून आलेले रेशन धान्य वंचित नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, तहसीलदार शामल खोत यांनी सर्वसामान्य नागरिकांना धान्य मिळत नसेल, तर या प्रकरणात आम्ही लक्ष घालू आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देव, असे आश्वासन दिले आहे.
रेशन धान्य लाभार्थींमध्ये विरोधाभास…
राम पाटील म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच माहिती अधिकारात तालुका पुरवठा विभागाकडून माहिती घेतली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे आप तर्फे तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. तालुक्यातील हजारो कुटुंबांचे ४४ हजारांच्या आत वार्षिक उत्पन्न आहे. त्याचबरोबर कुणाकडे फोर व्हीलर नाही, कोणी सरकारी नोकरीला नाही, इन्कम टॅक्स भरत नाहीत असे हजारो कुटुंब शिराळा तालुक्यात असूनसुद्धा या लोकांना राशन धान्य मिळत नाही. याउलट, चारचाकी गाडीतून फिरणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना रेशन मिळते, असा विरोधाभास आहे.