राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर रॅलीदरम्यान हल्ला
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या डोक्यातच गोळी झाडली

राष्ट्रीय : कोलंबियामध्ये 2026मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. मिगुएल उरीबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कॉन्सर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य आहेत. या निवडणुकीत ते राष्ट्रपतिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. याच निवडणुकीच्या निमित्ताने ते बोगोटामध्ये एका सभेला संबोधित करत होते. दरम्यान, त्यांच्यावर मागून गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक मीडियानुसार, मिगुएल यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याचे सांगितले जात आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आईचीही 34 वर्षांपूर्वी झाली होती हत्या
मिगुएल उरीबे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बोगोटा कौन्सिलचे सदस्य म्हणून झाली होती. ते अवघे 39 वर्षांचे आहेत. ते कोलंबियाचे माजी राष्ट्रपती जूलियो सेझर टर्बे यांचे नातू आहेत, जे 1978 ते 1982 पर्यंत कोलंबियाचे 25 वे राष्ट्रपती होते. त्यांची आई डायना टर्बे एक पत्रकार होत्या. त्यांची हत्या 34 वर्षांपूर्वी बोगोटा शहरात झाली होती. 1991 मध्ये ड्रग माफियाने त्यांचे बोगोटामधून अपहरण केले होते. त्या सातत्याने ड्रग तस्करी आणि संघटित गुन्ह्यांविरुद्ध लिहित होत्या.
हेही वाचा – ते तर 25 जागा जिंकू शकत नव्हते…त्यांनी राज्याच्या निवडणूक हायजॅक केली, राहुल गांधीनंतर राऊत सुद्धा आक्रमक
या नेत्यांवरही झाले होते हल्ले
13 जुलाई 2024 रोजी अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियाच्या बटलर शहरात हल्ला झाला होता. तेही एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, जी त्यांच्या कानाजवळून गेली होती. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. हल्ला केलेल्या आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीच ठार केले होते.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरही जुलै 2022 मध्ये नारा शहरात निवडणूक सभेत गोळी मारण्यात आली होती. त्यांच्यावरही मागून गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी त्यांच्या मानेवर आणि दुसरी छातीतून आरपार गेली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
1991 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी निवडणूक प्रचारासाठी तमिळनाडूला गेले होते. 21 मे रोजी श्रीपेरंबदूर येथे फुलांचा हार घालण्याच्या बहाण्याने धनु नावाची महिला त्यांच्याजवळ आली होती. तिने पायाला स्पर्श करण्याच्या बहाण्याने बटण दाबून स्वतःला स्फोटाने उडवले होते. या स्फोटात राजीव गांधींसह 16 जणांचा मृत्यू झाला होता.