फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कशा पद्धतीने मारलं, फोटो सोमवारी व्हायरल

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं, त्याचे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. ते फोटो आपण आधी बघितले नव्हते, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
‘फोटो व्हायरल झाल्यानंतर राजीनामा झाला, राजीनाम्याला एवढा वेळ का लागला? तुम्हाला धमकी द्यावी लागली का?’ असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सीआयडीचा तपास घोषित केला. मी सीआयडीला आधीच सांगितलं होतं की, तपासामध्ये कुणाचाही हस्तक्षेप होता कामा नये. त्यांनी चांगला तपास केला. आमच्या फॉरेन्सिक टीमने जे मोबाईल गायब झाले होते आणि ज्या मोबाईलचा डेटा डिलिट करण्यात आलेला होता. त्या मोबाईलमधील सर्व डेटा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करुन मिळवला. आज सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत, त्याचं कारण पोलिसांनी चांगलं काम केलं आहे. हे सगळे फोटो, व्हिडीओ चार्जशीटचा भाग झाले आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मला वाटतं या सगळ्या प्रकरणात सीआयडीने चांगलं काम केलं आहे. ज्या दिवशी चार्जशीट दाखल झालं तेव्हा मला सगळं कळलं. तोपर्यंत मलाही यातलं काहीही माहिती नव्हतं. मी गृहमंत्री असलो तरी एकदाही म्हटलो नाही की मला सांगा किंवा काही दाखवा. मी ते फोटोही बघितलेले नव्हते. चार्जशीट दाखल झाल्यानंतरच मी ते फोटो बघितले. कारण मीच याला सॅनिटाईज केलं तर दुसरं कुणी हिंमतही करणार नाही, त्यामुळे याची गरज होती.
हेही वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रतिज्ञापत्राची ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ
उज्ज्वल निकम यांच्या निवडीला उशीर का झाला?
मुख्यमंत्री म्हणाले की, उज्ज्वल निकम हे देशातले सर्वात मोठे क्रिमिनल लॉयर आहेत. आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा ते हो म्हणाले. त्यांना नियुक्त करायला उशीर झाला त्याला कारणंही आहे. कारण, नियमानुसार खटल्याचा लॉयर हा चार्जशीटमध्ये असिस्ट करु शकत नाही. त्यामुळे ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली त्याच दिवशी आपण त्यांना अपाईंट करु शकतो. हे लोकांना माहिती नसतं, केवळ आरोप केले जातात.
धनंजय मुंडेंचा राजीनामा कसा घेतला?
”धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्यवेळी झाला की चुकीच्या वेळी झाला, याच्या वादात मी पडणार नाही. पहिल्या दिवशी राजीनामा झाला काय अन् उशिरा झाला काय, राजकारणात टीका होतच असते.आम्ही यात स्पष्ट भूमिका घेतली होती की, ज्या पद्धतीने हत्या झाली आहे आणि यात जो मास्टरमाईंड आहे तो जर मंत्र्याच्या एवढ्या जवळचा असेल तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे. मला वाटतं, युतीचं सरकार असल्याने निर्णयाला जरा वेळ लागतो. राजीनाम्यावर मला जेवढं सांगायचं आहे, तेवढं मी स्पष्ट सांगितलं आहे. याउपर मी जास्तकाही सांगू शकणार नाही.” असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा