ओवैसी यांच्या यॉर्करवर पाकिस्तान क्लीन बोल्ड !

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताची बाजू विविध देशांना पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्वपक्षीय खासदार, काही ज्येष्ठ नेते, काही निवृत्त राजनैतिक अधिकारी असलेली ही प्रतिनिधी मंडळे संपूर्ण जगभर सध्या भारताची भूमिका कशी योग्य आहे? आणि दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान कसा खोटारडा आहे हे समजावून सांगत आहेत !
केंद्र सरकारची ‘डोकॅलिटी’ !
सदस्यांची निवड करताना केंद्र सरकारने अत्यंत ‘डोकेबाजपणे’ व्यूहरचना केली आहे. त्यात सर्व सदस्यांचा पूर्वानुभव, राजकीय अनुभव, वक्तृत्वकला, परिपक्वपणा आणि सर्वात शेवटी यातून भारताच्या अंतर्गत राजकारणावर पडणारा प्रभाव याचा अगदी बारकाईने विचार केलेला आहे. या सर्वांमध्ये अगदी पटकन नजरेस भरणारी निवड आहे ती ‘एमआयएम’ चे नेते असदुद्दीन ओवैसी यांची! ओवैसी हे हैदराबादमधून निवडून आलेले त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत. त्यांची संसदेतील आणि बाहेरील जातीय विष पेरणारी भाषणे, त्यांची नेहमीची ‘धर्मांध’ भूमिका यामुळे ते नेहमीच भाजपा विरोधी मानले जातात. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात त्यांनी घेतलेली टोकाची भूमिका, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पण, आता जादूची काठी फिरली आहे. इतर राष्ट्रांमध्ये भारताची भूमिका मांडताना ओवैसी यांनी टाकलेल्या यॉर्करवर पाकडे क्लीन बोल्ड होत आहेत.
इस्लामी राष्ट्रांमध्ये ओवैसींचा बोलबाला..
पहलगाममध्ये पाक पुरस्कृत भ्याड दहशतवाद्यांनी ‘धर्म’ विचारून हिंदू पर्यटकांची हत्या केल्यावर ओवैसी यांच्यामधील ‘राष्ट्रधर्म’ अचानक जागृत झाला आणि त्यांनी पाकवर टीकेचे आसूड ओढण्यास सुरुवात केली, हे संपूर्ण जग पाहत आहे. केंद्र सरकारने ओवैसींमधील जागृत झालेले ‘राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग’ अचूक हेरले आणि त्यांची परदेशी जाणाऱ्या मंडळामध्ये अचूक निवड केली. बरं त्यांना कुठे पाठवले, तर मुख्यत: इस्लामी देशांमध्ये! ओवैसींनी सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित असलेली भूमिका उत्तमपणे वठविली यात मुळीच वाद नाही. पण, म्हणून ओवैसी हे भाजपाला अपेक्षित असलेले हिंदुत्ववादी झाले का? असे होणे मुळात शक्य वाटत नाही.
तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांचा विरोधच..
भारतात परतल्यावर, ओवैसी पुन्हा एकदा आपल्या मूळ पदावर जातील हे निश्चित ! वक्फ सुधारणा विरोधात ते देशभर रान उठवतीलच, तसेच संसदेतही त्यांची आगपाखड चालूच राहील.. मोदी सरकारला नको नको करून सोडतील! पण, फरक एवढाच होईल, की यापूर्वी त्यांना भाजपाकडूनच फक्त विरोध होत असे, तो आता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल, समाजवादी, उबाठा गट, द्रमुक तसेच तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष्यांच्या मित्रांकडून अधिक होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
भाजपाची ‘ए’ टीम होणार?
दुसरे म्हणजे ओवैसी यांनी जी ‘राष्ट्रवादी’ भूमिका घेतली, ती अत्यंत धोरणीपणाने.. आपली ओळख केवळ ‘मुस्लिम नेता’ अशी न राहता, ‘राष्ट्रवादी मुस्लिम नेता’ अशी निर्माण करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. या प्रतिमेचा फायदा घेत, आपल्या ‘धार्मिक’ राजकारणाला उदारमतवादी मुस्लिमेतर जनतेचा पाठिंबा मिळवून आपला पाया अधिक विस्तृत करून शेवटी देशातील मुस्लिमांचा एकमेव नेता होण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच इतर निधर्मी पक्षांचा त्यांना असलेला विरोध वाढत जाईल, कारण या पक्षांची व्होट बँक ओवैसी यांच्याकडे वळू शकते. आतापर्यंत हे पक्ष ओवैसी यांना भाजपाची ‘बी’ टीम म्हणत होते. आता, ओवैसी यांचे ‘प्रमोशन’ होऊन त्यांच्या पक्षाला भाजपाची ‘ए’ टीम म्हटले जाईल, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे!
ममतादीदी जाळ्यात अडकल्या !
केंद्र सरकारचा दुसरा ‘मास्टरस्ट्रोक’ होता, तो तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाणची केलेली निवड. युसूफ पठाण एक तर मूळ गुजराती, तो बंगाली नाही. तो ‘टी एम सी’ मध्ये देखील उपरा आहे. ममता बॅनर्जी यांचे ‘अल्पसंख्यांक’ प्रेम जगजाहीर आहे, त्यांना युसूफ पठाणची निवड मान्य झाली नाही आणि त्यांनी त्याच्या जागी आपला ‘तथाकथित’ भाचा अभिषेक बॅनर्जी याची निवड केली. यातून ममतादीदींचे’मुस्लिम प्रेम’ बेगडी आहे आणि त्या परिवारवादी आहेत, हे सिद्ध करण्यात भाजप यशस्वी झाला. थोडक्यात, भाजपाने टाकलेल्या जाळ्यात ममतादीदी अडकल्या !
हेही वाचा – वाय.बी. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा !
काँग्रेस भोवती फेकले जाळे..
या प्रतिनिधी मंडळाच्या निमित्ताने मोदींनी काँग्रेसला चांगलेच खिंडीत गाठले. शशी थरूर यांनी ज्या प्रकारे भाजपा सरकारच्या समर्थनार्थ दंड थोपटले आहेत आणि ज्या हिरीरीने ते भारत सरकारची भूमिका लावून धरत आहेत त्यामुळे थरूर यांनी राहुल गांधींना प्रसिद्धीपासून झाकोळून टाकले आहे. केंद्र सरकारने थरूर, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद या काँग्रेसी नेत्यांना सामावून घेतले, ते काँग्रेसला न विचारता..आता हे सर्व काँग्रेस नेते अंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भारत सरकारची बाजू मांडत आहेत. हीच काँग्रेसला मोठी चपराक आहे.
काँग्रेसला शशी थरूर यांची ॲलर्जी..
काँग्रेस शशी थरूर यांच्यावर तुटून पडली आहे. पण त्यांना पक्षातून काढून टाकण्याची हिंमत होत नाही. थरूर यांना पक्षातून काढले तरी त्यांचे संसद सदस्यत्व कायम राहील. पण, काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ मात्र एकाने घटेल. थरूर यांना हे पूर्ण माहीत आहे. त्यामुळे तेही आपणहून काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतःची खासदारकी गमावण्याचा वेडेपणा करणार नाहीत. काँग्रेसमध्येच राहून ते काँग्रेसच्या धोरणाविरोधात वागतील, असे दिसते. काँग्रेसच्या दृष्टीने ते ‘अस्तनीतील निखारा’ ठरतील. केरळची पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने थरूर यांना हाताशी धरले आहे.
काँग्रेसची संभ्रमावस्था..
काँग्रेसने समजा थरूर यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत काँग्रेसने केली, तर मग बाकी तिवारी, खुर्शीद, शर्मा, अमरसिंग यांच्याबद्द्लही तशीच भूमिका घेण्यासाठी काँग्रेसवरील दबाव वाढत जाईल. थोडक्यात थरूर यांनी काँग्रेसची अवस्था ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी करून सोडली आहे, हे सूज्ञ राजकारण्यांच्या लक्षात आलेही असेल !
शरद पवार यांच्या दुखण्यावर इलाज..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेना एका प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व देऊन मोदींनी शरद पवार यांच्या दुखण्यावर इलाज केला आहे. आता शरद पवार यांना कुंपणावर बसण्याची भूमिका अधिकृतपणे घेण्याची सोय झाली आहे. द्रमुकच्या कानिमोझी यांनाही हे एका प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व देऊन स्टॅलिनला इशारा दिला आहे. कारण, कानिमोझी या स्टॅलिनचा सावत्र भाऊ अलिगेरी याच्या गटातील मानल्या जातात. भाजपाची ही कूटनीती प्रचंड यशस्वी होत आहे. ‘उबाठा’ गटाच्या प्रियंका चतुर्वेदींना घेऊन संजय राऊत यांना केंद्र सरकारने त्यांची जागा दाखवून दिलीच. पण, त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांनाही दुर्लक्षित केले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सन्मान..
शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हेही एका गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना नेतृत्व देऊन एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डॉ. शिंदे यांची परदेशातील चौफेर बॅटिंग संपूर्ण जनता पाहात आहे, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणखी खुलणार असून एक समतोल नेता अशी त्यांची ओळख होऊ लागली आहे.
मोदी सरकारचे एका दगडात अनेक पक्षी !
एकूणच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या निमित्ताने मोदी सरकारने एकाच दगडात पाकबरोबरच देशांतर्गत अनेक पक्षी मारण्याचे अनोखे उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यामुळेच काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या बुडाला आग लागली असून ती विझण्यासाठी आणखी कित्येक महिने जावे लागणार आहेत, हे नक्की !