विरोधक एवढे निराश का?
महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडून दररोज सभा, भाषणे, प्रचाराचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः दिवसाला चार-पाच सभा घेत मैदान तापवत आहेत. पण याच मैदानात एक बाजू मात्र शांत आहे—ती म्हणजे विरोधकांची.
ही शांतता चिंतनशील नाही, तर अस्वस्थ करणारी आहे. लोकशाहीसाठी धोक्याची आहे. कारण जेव्हा विरोधकच उत्साहहीन असतात, तेव्हा लोकशाहीचा श्वास मंदावतो.
नेत्यांच्या चेहऱ्यावरच जर लढण्याची जिद्द नसेल, तर कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा कुठून निर्माण होणार? आणि कार्यकर्तेच निष्क्रिय असतील, तर मतदार तरी विरोधकांकडे गांभीर्याने का पाहतील? आज अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. याचे कारण सत्ताधाऱ्यांचे सामर्थ्य कमी आणि विरोधकांचा निरुत्साह जास्त आहे. विरोधी पक्ष उमेदवारच देत नसेल, तर ‘सामना’ होणार तरी कसा? आणि मग पराभवानंतर सत्ताधाऱ्यांवर टीका करून काय साध्य होणार? आश्चर्याची बाब म्हणजे निवडणुकीला केवळ काही दिवस शिल्लक असताना देखील विरोधकांच्या सभा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. माध्यमेही या स्थितीकडे नाराजीने पाहत आहेत. कारण विरोधकांची निराशा ही केवळ त्यांची समस्या नाही, तर संपूर्ण लोकशाहीसाठीचा प्रश्न आहे.
हेही वाचा – भीम क्रांती सामाजिक संस्थेचा प्रभाग १२ तळवडे–रुपीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला जाहीर पाठिंबा
विरोधकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, विजय मिळणे हेच लढ्याचे अंतिम मोजमाप नसते. किमान लढल्याचे समाधान तरी मिळायला हवे. जनतेसमोर आपली भूमिका मांडणे, प्रश्न उपस्थित करणे, पर्याय देणे—ही तुमची लोकशाहीतील जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने हे दाखवून दिले आहे की, विरोधकांसाठीही जागा आहे. मतदान केवळ पैशांवर होत नाही, हा समज खोटा ठरतो—पण त्यासाठी विरोधकांनी सतर्क, सक्रिय आणि सकारात्मक असणे गरजेचे आहे.
आज अनेक कार्यकर्ते आणि नेते पक्षांतर करत असतील, तर त्यामागे तुमचा निराशावादी दृष्टिकोनही कारणीभूत आहे, हे सत्य स्वीकारावे लागेल. इतिहास साक्ष देतो—आपत्कालीन स्थितीनंतर जनता पक्षाने सभा, संवाद आणि संघर्षाच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला. सत्ताधाऱ्यांचा पराभव होऊ शकतो, हे त्यांनी करून दाखवले. म्हणजेच योग्य प्रयत्न झाले, तर यश अशक्य नाही. म्हणूनच विरोधकांना एवढेच सांगावेसे वाटते—मनापासून ही निवडणूक लढा. आम्हालाही दोन बौद्धिकदृष्ट्या तुल्यबळ पक्षांचा सामना पाहू द्या. निदान लोकशाहीला आणि जनतेला तरी बौद्धिक खाद्य द्या. हीच सामान्य जनतेची मनापासून अपेक्षा इतकेच.
धन्यवाद
— हर्षल आल्पे




