आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीवर प्राणघातक हल्ला
शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत नितीन देशमुख यांची तीव्र नाराजी, पोलीस यंत्रणेवर टीका
अकोला : बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी याच्यावर रविवारी दुपारी साडेचार वाजता प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सराईत गुन्हेगाराकडून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. शहरातील सिविल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी नगरात घडलेल्या या घटनेनंतर शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया दिला.
सविस्तर असे की, आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी देशमुख हा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत स्वाद बेकरीसमोरच्या कपड्याच्या दुकानावर उभा होता. काही युवक त्या ठिकाणी आले आणि अचानक त्याला बेदम मारण्यास करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा मित्र धावत दुकानात शिरला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेत पृथ्वीला व त्याच्या मित्राला दुखापत झाली आहे.
शिवसैनिक पोलिस ठाण्यात
आमदाराच्या मुलावर हल्ल्याची झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे समजते. आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलिस ठाण्यात पोहाचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहर असुरक्षित: आमदार देशमुख
अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलीस यंत्रणेवर टीका केली आहे. जर पोलीस गुंडांचा बंदोबस्त करणार नसतील तर आम्हाला मैदानात उतरावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.