बिहारमध्ये पुन्हा एकदा NDAची सत्ता, विक्रमी बहुमत; काँग्रेससह राजदचीही निकालात धुळधान….

Bihar Assembly Elections 2025 : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (दि. १४) रोजी जाहीर झाले. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएच सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीपूर्वी एनडीएसमोर महागठबंधनचे तगडे आव्हान असल्याचे दिसत होते; मात्र निकालानंतर बिहारमध्ये काँग्रेस-राजदचा सत्तापालटाचा फुगा फुटला आहे. भाजप-जदयुच्या आघाडीने न भूतो न भविष्यती जागा जिंकत बिहारमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. बिहार विधानसभेत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयाबाहेर मोठा जल्लोष केला आहे. यादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून विरोधीपक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने होणाऱ्या निवडणुकीतील पराभवाचे प्रतीक बनले आहेत, असा दावा भाजपने केला. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगावर नागरिकांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
रात्री ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एनडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, भाजप ७७ जागी विजयी(१२ आघाडी), जेडीयू ६१ जागी विजयी(२४ आघाडी) झाली होती, तर आरजेडी १७ जागी विजयी आणि ८ जागेवर आघाडीवर होती. एलजेपीआरव्ही १५ जागेवर विजयी आणि ४ जागेवर आघाडीवर होती, तर एमआयएमने ५ जागेवर विजय मिळवला होता तर कॉग्रेस ३ जागेवर विजयी आणि ३ जागी आघाडीवर होती.
निवडणुकीआधी १२५ युनिटपर्यंत मोफत वीज हा सर्वात चर्चेत राहिलेला मुद्दा होता. ‘फ्रीबीज’ अर्थात रेवडी वाटपाच्या विरोधात बोलणारा नेता असा निर्णय कसा घेईल, याचीही जोरदार चर्चा झाली. पण, नितीशकुमार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती वेगळीच होती. मोफत वीजमुळे वाढणारा आर्थिक बोजा दुर्गम भागात सोलार पॅनल वितरित करून एकूणच भविष्यात कमी करता येईल, असे त्यांचे गणित होते, ही खास नितीश यांची रणनीती होती. याशिवाय निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णयही गेमचेंजर ठरल्याचे निकालात दिसत आहे.
हेही वाचा – दृष्टिहीन विद्यार्थ्यांसोबत लुटला बाल दिनाचा आनंद!
मतचोरीचा मुद्दा ठरला फोल; काँग्रेसचा निवडणुकीत धुव्वा
मतचोरीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वातावरण तापविले होते, पण बिहारमधील मतदारांवर या मतचोरीच्या आरोपांचा काहीच परिणाम झालेला नाही हेच निकालावरून स्पष्ट झाले. बिहारमधील मतदारांनी महागठबंधनला नाकारले पण त्याच वेळी काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. उत्तर भारतात काँग्रेसची पिछेहाट कायम असून, जनाधार स्वत:कडे वळविण्यात राहुल गांधी यांनाअजूनही यश मिळालेले नाही. बिहारमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
मुस्लिम-दलित मतदारांनीही नाकारले महागठबंधनला
बिहारमधील मतदारांनी लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव, काँग्रेस, डावे पक्ष यांच्या आघाडीला नाकारले. मुस्लिमबहुल सीमांचलमध्येही नितीशकुमार-भाजप युतीला मिळालेल्या यशाने काँग्रेस, राजदला मतपेढीही कायम राखता आलेली नाही. दलित -मुस्लीम या समीकरणावर राजदची भिस्त होती. पण तेथेही महागठबंधन कमी पडल्याचे निकालात स्पष्टपणे दिसले.
काँग्रेसची पीछेहाट कायम
लोकसभेतील इंडिया आघाडीच्या माध्यमातून काही अंशी यश मिळविल्यानंतर मरणासन्न अवस्थेतील काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, अशी आशा होती. मात्र, लोकसभेनंतर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि आता बिहार या सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. जम्मू आणि काश्मीरमध्येही काँग्रेसला मर्यादित यश मिळाले. हरियाणामध्ये सत्तेची स्वप्ने बघणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्रात सर्वात निचांकी जागा काँग्रेसला मिळाल्या. दिल्लीमध्ये भोपळाही फोडता आला नाही. बिहारमध्ये दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. यावरून लोकसभेत खासदारांचा ९९चा आकडा गाठणाऱ्या काँग्रेसला लोकसभेनंतर झालेल्या चारही राज्यांमध्ये मोठा फटका बसला आहे.
बिहारच्या राजकारणाचा किमयागार
बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे अजूनही बिहारच्या केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या निकालांनी पुन्हा एकदा एनडीएला मिळालेल्या बहुमतामुळे उत्साह वाढला आहे. असे असले, तरी भाजपापेक्षा कमी जागांवर लढूनही जदयुने दाखवलेली कामगिरी नितीश यांच्या राजकीय किमया अधोरेखित करणारी आहे. संख्या कितीही असो, सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार? हे नितीश कुमारच ठरवणार, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
नितीशकुमारांची ढासळती तब्येत ठरली चर्चेचा विषय
७४ वर्षांचे नितीशकुमार यांची शारिरीक स्थिती गेल्या काही महिन्यामध्ये खालावल्याचे दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची तब्येत हा चर्चेचा विषय होता. त्यांचाच जुना वेग ते गाठू शकत नाहीत, बोलताना त्यांना मध्येच थांबावे लागते, अशी त्यांची स्थिती होते. असे असतानाही निवडणूक प्रचारात तेच सर्वप्रथम मैदानात उतरले. वयानुसार आलेला थकवा त्यांच्या भाषणांमध्ये दिसत असला, तरी चेहऱ्यावर मात्र विजयाचेच भाव होते.
घुसखोरांना वाचवणाऱ्यांना जनतेचे परखड उत्तर : अमित शाह
बिहारच्या जनतेने दिलेले एकेक मत भारताच्या सुरक्षेशी खेळणारे घुसखोर व त्यांच्या हितसंबंधींच्या विरोधात मोदी सरकारच्या धोरणावर विश्वासाचे प्रतीक आहे. व्होटबँकेसाठी घुसखोरांना वाचवणाऱ्यांना जनतेने परखड उत्तर दिले आहे. बिहारच्या जनतेने पूर्ण देशाचा मूड जाहीर केला आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावीच लागणार आहे. याच्याविरोधातील राजकारणाला कोणतीही जागा नाही. त्यामुळेच राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आज बिहारमध्ये शेवटच्या पायरीवर पोहोचली आहे.
तेजस्वी यादव यांना वाट पाहावी लागेल : उपेंद्र कुशवाह
बिहार निकालावर बोलताना राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह म्हणाले की, ”मी तेजस्वी यादव यांना सांगू इच्छितो की जर त्यांना पुढील १० किंवा २० वर्षांत सत्तेत यायचे असेल तर त्यांना त्यांची पद्धत बदलावी लागेल. त्यांच्या लोकांनी वर्तन बदलावे लागेल. बिहारच्या लोकांनी त्यांना नाकारले आहे आणि त्यांनी बिहारमध्ये असा चेहरा निर्माण केला आहे की त्यांना बिहारच्या लोकांनी नाकारलेच पाहिजे.”
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडासाफ
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे बिहारमध्ये उतरलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब ठरली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्यासाठी बिहारमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु मतदारांनी राष्ट्रवादीची दखलच घेतलेली नाही, असे निकालांवरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असूनही बिहारमध्ये मात्र राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. हीच रणनीती पक्षासाठी घातक ठरल्याचे निकालांवरून दिसत आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल निवडणूक मोहिमेचे प्रभारी होते; मात्र निकालांनी त्यांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.




