गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात वाढ; युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नागरिकांना शांततेचे आवाहन

LPG Gas Cylinder : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील एलपीजी (LPG Gas Cylinder) पुरवठा विस्कळीत झालेला असताना वितरक केंद्रांवर वैध ओळखपत्र दाखवून थेट (काउंटरवरून) खरेदी करता येणाऱ्या ५ किलोच्या लहान गॅस सिलिंडर्सची विक्री वाढवण्यात आली आहे.
यासाठी सरकारने पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढवला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, २३ मार्चपासून आतापर्यंत सुमारे ६.६ लाख सिलिंडर्सची विक्री झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात शनिवारी ५ किलोचे ९०,००० हून अधिक एफटीएल सिलिंडर्स विकले गेले असून २३ मार्च २०२६ पासून सुमारे ६.६ लाख सिलिंडर्सचा पुरवठा करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार’;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याशिवाय शनिवारी दिवसभरात ५१ लाखांहून अधिक घरगुती सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले असून, एकूण मागणीपैकी ९५ टक्के मागणी ऑनलाइन बुकिंगद्वारे नोंदवली गेली आहे.
सरकारने घरगुती गॅस आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. विशेषतः कुटुंबे आणि रुग्णालये व शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी हा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. त्याच वेळी, रिफायनरींमधील उत्पादन वाढवून मागणीचे व्यवस्थापन केले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे. मार्चपासून आतापर्यंत ५०,००० हून अधिक सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहे. तसेच १,४०० हून अधिक वितरकांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत; यात आतापर्यंत ३६ वितरक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.





