रडतरौताची फेकाफेकी, पण,राजकारण ढवळलं !

वाचक हो, आपल्याला माहीत आहे, की अनेकदा उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणजेच रडतरौत आणि त्यांची बेफाम वक्तव्ये हा आपल्या ‘संपादकीय’ मध्ये लिहिण्याचा विषय नाही असे सांगत आलो आहे. परंतु, गोबेल्सनीती नुसार एखादे मत वारंवार सांगितले, की ते खरे वाटायला लागते, त्यामुळे त्यातली सत्यता सांगण्यापेक्षा जे सांगितले जाते, ते कितपत योग्य आहे, हे पाहावे लागते. आता, हे सांगणे हा संजय राऊत यांच्याबाबत लिहिण्याचा विषय होतो. बाकी त्यांच्याबद्दल लिहावे, त्यांचे विचार खोडून काढावेत, इतके महान विचार अथवा त्यांच्या विचारांची योग्यता नाही.
पुस्तकात असणार फेकाफेकी..
सध्या ‘नरकातील स्वर्ग’ या त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे निमित्त आहे. ते हे निमित्त आपल्या फायद्याचे कसे होईल? याच्या जोडणीला लागले आहेत. राऊत तुरुंगात जाताना, त्यांनी जो माहोल निर्माण केला होता, तो एखाद्या युद्धाला जाणाऱ्या सरसेनापतीला निरोप देण्याच्या पद्धतीचा होता. घरातील बहुतेक कुटुंब सदस्य संजय राऊत यांच्या तुरुंगात जाण्याला देशभक्ती, देशप्रेम समजत होते. आठवते का, संजय राऊत भगवा गमचा हवेत फिरवत होते. त्यांचे बंधू सुनील राऊत हे तर भावविभोर झाले होते. त्यानंतर राऊत शंभर दिवस साधारणत तुरुंगात होते. तिथे त्यांना स्वर्ग दिसला. हा साक्षात्कार कोणालाही होत नाही, हे प्रथम लक्षात घ्या!
शरद पवारांचा विश्वामित्री पवित्रा..
त्यामानाने राऊत खूपच भाग्यवान, दैवी सामर्थ्याचे म्हटले पाहिजेत. अशा परिस्थितीत त्यांनी ज्या प्रकारे हे पुस्तक लिहिले, ते त्यांचे कल्पनारंजन असण्याची शक्यता अधिक आहे. तुरुंगात राऊत यांना दैनंदिन लिखाणासाठी फार काही मुद्दे उपलब्ध असतील, घटना घडल्या असतील, असे नाही. त्यामुळे खयाली पुलाव आणि भूतकाळाची आठवण एवढीच दोन मनोरंजनाची साधने त्यांच्या जवळ होती. त्यातले भूतकाळ आणि खयाली पुलाव एकत्र करून शरद पवार यांना न विचारता त्यांनी हे पुस्तक काढले असावे. या पुस्तकाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन आहे. त्यात शरद पवार पुस्तकातील त्यांच्या संबंधित घटनांबाबत विश्वामित्री पवित्रा घेत राऊत यांच्या खयाला पुलावाला कसे नाकारतील, हे दिसून आले आहे.
नरेंद्र मोदी आणि शाहांचे किस्से !
पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत लिखाण केले आहे. हे दोघे जेव्हा गुजरात दंगलीत आरोपी होते, तेव्हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कसे आले होते.. बाळासाहेबांनीं मोदी यांना कसे पंतप्रधान केले? न्यायाधीशांना कसा फोन केला? किंवा शरद पवार यांनी कसा त्यांना जामीन मिळवून दिला, हे लिहिल्याचे माध्यमांमुळे समजत आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचायला मिळाले नाही. मात्र, या घटनांचे उल्लेख त्यात आहेत, असे राऊत मान्य करत आहेत. थोडक्यात, त्यांचे हे लिखाण ‘सनम गर हम डुबे, तो तुम्हे भी साथ लेके डुबेंगे I’ या धर्तीवर आहे, असे दिसते.
हेही वाचा – वेळेच्या आठ दिवस आधीच मोसमी पाऊस दाखल; गेल्या १६ वर्षांत भारतात सर्वात लवकर आगमन
मोदींची मदत अडचण ठरू शकते..
कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली, हे विधान शरद पवार यांना अडचणीचे ठरू शकते. पवार आणि मोदी- शाहा यांच्या संबंधामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी अडथळ्यांचे होऊ शकते. शरद पवार भाजपाबरोबर जाण्याच्या मन:स्थितीत आहेत . राऊत यांच्या या लिखाणामुळे पवार यांच्यावर अविश्वासाचा जो शिक्का आहे, तो अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांना ब्रेक लावण्यासाठी?
कदाचित, शरद पवार यांनी भाजपा बरोबर जाण्याच्या हालचाली करु नयेत किंवा त्याला थोडा तरी ब्रेक लागावा, त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण व्हावा. यासाठीच असे लिखाण राऊतांनी केले असावे! बरं, अमित शाहा यांच्यासंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या न्यायाधीशांना फोन केला, हे नैतिकतेमुळे सांगू शकत नाही, असे ते म्हणतात. पाह, किती बालिशपणा आहे. कोणत्या न्यायाधीशांसमोर शाहा यांची केस सुरु होती, हे आज सहज समजू शकते. त्यात नाव न सांगण्याचे काय मोठे नैतिकतेचे कौतुक? तुम्ही ही हिंदू आहात, हे बाळासाहेब यांचे न्यायाधीशांना उच्चारलेले वाक्य म्हणजे शिवसेना (उबाठा) कशी हिंदुत्ववादी आहे, हे हिदुत्वकार्ड खेळून सांगण्याचा प्रयत्न.. बरं, ते न्यायधीश आणि त्याच बरोबर शरद पवार हे पद स्वीकारताना जी शपथ घेतात, त्याचा भंग करतात. ही बाब आजही तेवढीच गंभीर आहे. बाळासाहेब आज हयात नाहीत.. असते तर ते ही अडचणीत आले असते. उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे! पण, ते संजय राऊत यांना पाठीशी घालण्याची शक्यता जास्त आहे. या पुस्तकातील बरेचसे लिखाण उद्धव ठाकरे यांना दाखवून झालेले असणार, हे पण प्रत्येकजण जाणतो.
हे काँग्रेसला मान्य आहे का ?
संजय राऊतांनी जे मांडले आहे ते काँग्रेसला मान्य होणारे आहे का ? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यात हा विषय झालाच असेलच. काँग्रेसने याबाबत आपली भूमिका आता स्पष्ट केली पाहिजे. याचे कारण मोदी आणि शाहा यांच्यावर गुजरात दंगलीचे जे आरोप आहेत, (जरी ते त्यातून सुटले असले तरी) ते आरोप आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरकारवर होती आणि आज त्यांचाच सहयोगी, मित्रपक्ष सांगतो की मोदी, शाहा यांना आम्हीच सोडवले. शरद पवार यांनी आपले अंग काढून घेण्याची तयारी सुरु केलीच आहे. ‘इंडिया’ आघाडी संपल्याचे त्यांनी जाहीर केल्याने ते काँग्रेसला उत्तर द्यायला बांधील नाहीत. मात्र सोडवले असेल तर त्या दोघांनां का, कोणत्या, कशाच्या मोबदल्यात सोडवले, हे सांगणे आता शरद पवार यांना क्रमप्राप्त आहे.
त्यातूनही संजय राऊत यांना तुरुंगात टाकले, तेव्हा त्या दोघांना बाळासाहेबांच्या उपकाराची आठवण आली नाही का? असा सवाल राऊत यांनीं केला आहे. (मोदी,शाहांनी ठाकरे कुटुंबियांपैकी कोणालाच अटक केली नाही.राऊत ठाकरे घराण्यातले नाहीत हे कदाचित विसरले आहेत, असावेत.) मोदी, शाहा यांनी ठाकरे कुटुंबावर कोणते उपकार केले हे जग जाणते आणि ठाकरे यांच्या नोकरांवर, गडीमाणसांवर नरेंद्र मोदी, शाहा का उपकार करतील ? नरकातलं भूत का उरावर घेतील ?
मनोरंजनाचा नवा उद्योग..
या नव्या पुस्तकाकडे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कोणताही पुरावा न देता नुसती फेकाफेक करणे हे संजय राऊत यांचे वागणे, आता नवीन नाही. पाहू, पुस्तक कितपत चालते आणि त्याचा गहजब किती होतो ते !