देशाची राजधानी नवी दिल्ली आणि परिसरातील हवेची गुणवत्ता घसरली
दिवाळीनंतर शहराच्या अनेक भागात धुके आणि धुराचे थर
राष्ट्रीय : देशाची राजधानी नवी दिल्ली आणि परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळला आहे. घरातून बाहेर पडताच नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, तसेच अनेकांचे डोळे जळजळ करत आहेत. दिल्लीचे आकाश धुरकट झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. दिवाळीनंतर शहराच्या अनेक भागात धुके आणि धुराचे थर तयार झाले आहेत. तसेच यमुना नदीचे पाणी फेसाळले आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
दिवाळीमुळे प्रदूषणात वाढ?
दिल्ली आणि एनसीआरमधील हवा ही नेहमीच खराब असते. हवेची गुणवत्ता सामान्यतः AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) द्वारे मोजली जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) नियमानुसार, 0 ते 50 दरम्यानचा AQI चांगला असतो. 51 ते 100 दरम्यानचा AQI समाधानकारक, 101 ते 200 दरम्यानचा AQI मध्यम, 201 ते 300 दरम्यानचा AQI खराब आणि 301 ते 400 दरम्यानचा AQI खूप वाईट मानला जातो.
दिल्लीचा AQI 250 ते 350 दरम्यान होता. याचा अर्थ दिल्लीतील हवा आधीपासूनच खराब होती, त्यानंतर दिवाळीच्या रात्री ती आणखी खराब झाली. फटाक्यांमुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता 433 AQI पर्यंत घसरली होती. गुरुग्राममध्ये 433, अशोक विहारमध्ये 427, वजीरपूरमध्ये 423 AQI आणि आनंद विहारमध्ये 410 AQI पर्यंत पोहोचली.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्रविकासाचा संदेश – दिनेश यादव
गुरुग्राममध्ये सर्वात जास्त प्रदूषण
हवामानशास्त्रज्ञांच्या मते दिवाळीपूर्वी आणि नंतर दिल्लीतील हवामानात मोठा बदल झालेला नाही. आधीही प्रदूषण होते आणि आताही शहरातील हवा खराब आहे. विषारी हवा दिल्लीकरांच्या शरीरात प्रवेश करत आहे. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान, आनंद विहारमध्ये AQI 385, वजीरपूरमध्ये 366 आणि अशोक विहारमध्ये 364 होता. दिवाळीत गुरुग्राममध्ये सर्वात जास्त प्रदूषण झाले. एका रिपोर्टनुसार गुरुग्राममधील प्रदूषणाच्या पातळीत 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीच्या जुन्या आणि नव्या सरकारने अनेक पावले उचलली आहेत. मात्र प्रदूषणात फारशी सुधारणा झालेली नाही. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ सरकार नव्हे तर नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.




