#CoronaVirus: चोवीस तासांत ४०० नवे रुग्ण

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रणांचे विविध प्रयत्न सुरू असले, तरी गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात सरकारी आकडेवारीनुसार ४०० नव्या रुग्णांची भर पडली. ( मात्र बुधवारच्या बाधितांशी तुलना केली असता ही आकडेवारी ८००हून अधिक असल्याचे समोर आले. ) त्यामुळे सर्वच राज्यांनी उपाययोजना आणखी कठोर केल्या असून पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरचित्रसंवाद (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) साधत सूचना दिल्या आहेत.
२९ राज्यांमध्ये एकूण १९५५ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या चोवीस तासांमध्ये १२ रुग्ण दगावले आहेत. १५१ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी गुरुवारी दिली. संसर्ग झालेल्या सुमारे ४०० प्रकरणांचा सांसर्गिक संबंध तबलिगी जमात समूहाशी आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
कॅबिनेट सचिवांनी देशातील मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला आणि त्यांना तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांचे सखोल ‘काँटॅक्ट ट्रेसिंग’ सुरू करण्याचे, तसेच करोना विषाणूला आळा घालण्यासाठीच्या उपायांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, असे अग्रवाल म्हणाले.
सुगीचे दिवस असून पिकांच्या कापणीसाठी टाळेबंदीतून सवलत द्यावी लागत आहे, पण त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. करोना टाळण्यासाठी गरजेच्या सर्व अटी पाळून काम करावे. कृषी बाजारांशिवाय दुसऱ्या कोणत्या मार्गाने शेतीमाल खरेदी करता येईल याचाही राज्य सरकारांनी विचार केला पाहिजे, असे मत मोदींनी मांडले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्राने १ लाख ७५ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. एकाच वेळी बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाईल, अशी माहिती मोदींनी दिली.