व्यावसायिक LPG च्या वाटपात २० टक्क्यांची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Gas Cylinder : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत होता. अनेक ठिकाणी LPG गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता.
पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने देशातील सर्वच राज्यात व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत काही निर्बंध आणले होते. मात्र, घरगुती सिलेंडर देण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना सरकारकडून गॅस वितरकांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला होता. मात्र, आता केंद्र सरकारने व्यावसायिक LPG च्या वाटपात ५० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – ‘केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे’; फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आज व्यावसायिक एलपीजी ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्यांच्या व्यावसायिक गॅसच्या कोट्यात २० टक्क्यांनी अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्रशासित प्रदेशांना होणारा गॅसचा पुरवठा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मार्च पासून हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा व्यावसायिक गॅसच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे
दरम्यान, आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एलपीजी गॅसच्या व्यावसायिक पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कपात झाल्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना, विशेषतः त्यातील लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीच्या अतिरिक्त २० टक्क्याच्या वाटपाला मंजुरी दिली आहे.





