मोठा निर्णय : देशात औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून वाद सुरू
औरंगजेबाच्या कबरीत एकच माणूस प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था

राष्ट्रीय : सध्या देशात औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून वाद सुरू आहे. प्रकरण एवढं तापलं आहे की, काही जणांनी तर थेट औरंगजेबाची कबर पाडण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावण्यात आले असून, तिथे फक्त एकच माणूस प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. एकाचवेळी मोठा मॉब आता प्रवेश करू शकणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगजेबाच्या कबरीची पाहाणी बाहेरूनच करावी लागणार आहे.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की जो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला त्याची कबर इथेच बनली, हा इतिहास जगाला कळायला पाहिजे. आम्ही कुणाच्याही विरोधात जाणार नाही, मात्र हे सरकार बजरंग दलाचं आहे. कोरटकरांच्याविरोधात बजरंग दल आंदोलन का करत नाही? अबू आझमी, सोलापूरकर यांच्या विरोधात बजरंग दल आंदोलन का करत नाही? असा सवाल यावेळी दानवे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी हवी अध्ययावत इमारत!
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे, याबद्दल आमच सरकार विचार करेल. याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. जो निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठिशी आम्ही उभे राहू असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. याच्यावर चर्चा करण्यासारखा हा विषय नाही. निवडणुका जवळ आल्या की कोणाला कबर दिसते, कोणाला प्रभू रामचंद्र दिसतात. आम्ही सर्वधर्म समभाववाले आहोत, त्यामुळे आम्ही त्याच्यावर न बोललेलं बरं. मात्र हे सगळे मुद्दे निवडणुकीपुरते आणि राजकारणापुरते मर्यादित असतात. इतके दिवस कबर इथे होती तोपर्यंत कोणाला काही वाटलं नाही, आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आल्या आहेत तर कबरीचा विषय सुरू झाला, असा टोला कल्याण काळे यांनी लगावला आहे.