भाजपाला बंगालमध्ये मोठा धक्का, आमदार कृष्णा कल्याणींनी सोडला पक्ष
कोलकाता – पश्चिम बंगालमधील रायगंजचे भाजपा आमदार कृष्णा कल्याणी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव सरकार यांच्याशी वाद झाल्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. तेव्हा पासूनच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. राजीनामा दिल्यानंतर तृणमूल काँगेसने कल्याणी यांना आपल्या पक्षात येण्यासाठी निमंत्रण दिले आहे मात्र कल्याणी यांनी सध्या तरी अन्य पक्षात जाण्याची माझी कुठलीही योजना नसल्याचे म्हटले आहे.
आमदार कृष्ण कल्याणी यांनी भाजप खासदार देबश्री चौधरी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याबद्दल भाजपाने कृष्णा कल्याणी यांना नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस मिळण्याआधीच कल्याणी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपा सोडण्याची माहिती देतानाही कृष्णा कल्याणी यांनी देबश्री चौधरी यांच्यावर टीका केली आहे. देबश्री चौधरी हे रायगंजमध्ये माझा प्रभाव होण्यासाठी रचल्या गेलेल्या कटात सहभागी होते. ते अनेक दिवसांपासून माझ्याविरोधात कटकारस्थान रचत आहेत. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात मी राहू शकत नाही, मॅक्सय तक्रारींकडे राज्य आणि केंद्र नेतृत्वानेही कानाडोळा केल्याने मी आता वेगळा राहणे हेच योग्य ठरणार आहे असे कल्याणी यांनी म्हटले आहे. पुढे ते काय करणार याची माहिती त्यांनी दिलेली नाही.





