बद्रीनाथ मंदिराजवळ हिमस्खलन, ५७ पैकी १६ मजुरांची सुटका

Badrinath Glacier Burst | उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडच्या काही भागांत सुरू असलेल्या बर्फवृष्टी दरम्यान ही दुःखद घटना घडली आहे. वृत्तानुसार, चमोली येथील बद्रीनाथ धाम येथील माना गावाजवळील हिमनदीखाली गाडलेल्या ५७ कामगारांपैकी १६ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघातावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी कळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री धामी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.
हेही वाचा : ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स मराठी चित्रपट विकत घेत नाहीत’; पुष्कर जोग याचं वक्तव्य
उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आता ही दुर्घटना बद्रीनाथच्या अगदी जवळ घडली असल्याने, बर्फ हटवण्याचे काम खूप वेगाने केले जात आहे, रस्ता वेळेत मोकळा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून डोंगराळ भागात हवामान खूपच खराब आहे. उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.