अमेरिका, मित्र होऊ शकत नाही, भारताच्या लक्षात येत नाही का ?

गेल्या काही दिवसात भारताचे आणि अमेरिकेचे संबंध बऱ्यापैकी ताणले गेले आहेत. कारणे कोणतीही असोत, वरवर मैत्रीपूर्ण दिसणारे संबंध नेमके कसे आहेत, हे समजून घेण्याची वेळ आहे. अमेरिका हा पक्का मित्र नाही, आणि दिलदार शत्रू पण नाही हे लक्षात आले आहे.
दोन्ही देशांदरम्यानचा करार..
या पार्श्वभूमीवर आता भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेला व्यापार करार दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही देश लवकरच अंतरिम व्यापार करारावर सहमत होण्याची शक्यता असून अमेरिकन अधिकाऱ्यांची एक टीम पुढील महिन्यात या महत्त्वपूर्ण व्यापार चर्चेसाठी आणि नंतरच्या अपेक्षित करारासाठी भारताला भेट देणार आहे. सध्या तरी चर्चा योग्य दिशेने सुरू आहे.
व्यवसाय करा, पण पार्टनरशिप नको ..
अमेरिकेसोबत व्यवसाय करणे ठीक आहे. पण, महासत्तेला पार्टनर समजण्याची चूक करू नये. अमेरिका कोणाचाही जवळचा मित्र नाही आणि भारताने अलिकडेच याचे एक उदाहरण पाहिले आहे, अनुभवले आहे!
अमेरिका कोणाचाच मित्र नाही…
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून आणि त्यांची धोरणे बदलल्यापासून त्या राष्ट्राकडे एक विश्वासार्ह मित्र म्हणून पाहण्याची चूक आता भारत करणार नाही, असे सध्या तरी वाटते. दुसरीकडे, भारत-अमेरिका संबंधांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. एकीकडे, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ब्रह्मा चेलानी अमेरिकेला अविश्वसनीय धोरणात्मक भागीदार म्हणतात, तर दुसरीकडे, विवेक काटजू यांनी पाश्चात्य देशांमध्ये धोरणात्मक विचारसरणी बदलण्याच्या गरजेवर भर दिला आहे. भारताने अभ्यासपूर्ण विचार करून योग्य तीच पावले टाकणे, आता महत्त्वाचे ठरणार आहे.
भारताला आयात शुल्काचा दणका..
भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असून भारतातर्फे वाटाघाटी करणाऱ्या पथकाचे प्रमुख राजेश अग्रवाल अमेरिका दौऱ्यावर गेले होते, त्यांनी आपल्या अमेरिकन समकक्षाशी करारावर चर्चा केली. अमेरिकेने भारतावर काही शुल्क लादले होते, जे नंतर दि. ९ जुलैपर्यंत स्थगित केले गेले.
आधी शुल्क लादले, मग स्थगिती..
तथापि, याआधी दोन्ही देश व्यापार करारावर सहमत होऊ शकतात. तत्पूर्वी, अमेरिकेने दि. २ एप्रिलरोजी भारतावर २६ टक्के शुल्क लादले होते. पण, नंतर काही दिवसांत आयात शुल्क आकारणी दि. ९ जुलैपर्यंत स्थगित दिली. मात्र, आताही अमेरिका भारतीय वस्तूंवर १० टक्के शुल्क लादत आहे, हे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
दोन्ही देशांच्या कराराचा पहिला टप्पा..
भारत-अमेरिका व्यापार संबंध लक्षात घेता दोन्ही देशांनी या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले असून अमेरिका सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार १३१. ८४ अब्ज डॉलर्सचा असून भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिकेचा वाटा सुमारे १८ टक्के तर आयातीत ६.२२ टक्के आणि एकूण व्यापारात १०. ७३ टक्के आहे, हे आकडेवारीवरून दिसते. २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे. पण, भारत आणि अमेरिकेतील व्यापारातील फरक एवढाच आहे, की भारत अमेरिकेला जास्त वस्तू विकतो आणि कमी खरेदी करतो.
‘टॅरिफ’ चा बॉम्ब अमेरिकेच्या मूळावर..
हा सर्व विचार केल्यानंतर मूळ प्रश्न समोर येतो, तो म्हणजे अमेरिका भरवशाचा नाही का?
व्यापाराव्यतिरिक्त दोघांमधील संबंधांबद्दल तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. धोरणात्मक बाबींबद्दल तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’चा खरा परिणाम म्हणजे भारतासाठी अमेरिकेसोबतच्या संबंधांबद्दल ‘जागेची घंटा’ आहे. त्यांनी म्हटले की पहिल्यांदा बायडन आणि आता ट्रम्प या सलग दोन अमेरिकन प्रशासनांनी भारताला एक संदेश दिला आहे. म्हणजेच अमेरिका भारताचा विश्वासार्ह धोरणात्मक भागीदार नाही, हे आपल्या लक्षात यायला हवे.
एलोन मस्क आणि ट्रम्प दुरावा..
चेलानी म्हणाले की, बायडन प्रशासनाने ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’ द्वारे पाकिस्तानसाठी पॅकेजेस सुरू केली, पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांच्या ताफ्याचे अपग्रेडेशन केले आणि इस्लामाबादला ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात आघाडीची भूमिका बजावली. त्याचवेळी, खरे तर ट्रम्प यांनी भारताचे डोळे उघडले आहेत. त्यांनी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानची तुलना पीडित भारताशी केली आणि काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले. पण, सीमापार दहशतवादाच्या मुद्द्याचा उल्लेख त्यांनी टाळला असून एका दृष्टीने पाकिस्तानला अनुकूल अशीच भूमिका घेतली आहे आणि भारताकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिले आहे.
भारताने मोठा दणका दिला. पण..
चेलानी म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पूर्ण प्रमाणात युद्ध न होता, पाकिस्तानवर लष्करी खर्च लादण्याची भारताची क्षमता दाखवून दिली. तीन दिवसांच्या संघर्षादरम्यान भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये नूर खान आणि भोलारीसह प्रमुख पाकिस्तानी हवाई अड्डे उद्ध्वस्त झाले. पण, कोणतेही निश्चित प्रत्युत्तरात्मक नुकसान झाले नाही. चिनी मूळच्या शस्त्रातील कमकुवतपणा उघड झाला हे मात्र संपूर्ण जगाने पाहिले आहे.
अमेरिका विश्वासघातकी मित्र..
अमेरिका हा भारताच्या दृष्टीने आता विश्वासघातकी मित्र झाला आहे. त्यांच्या फायद्यासाठी भारताला खेळवत बसणे आणि पाकिस्तानला चुचकारत बसणे, हा त्यांचा जोड धंदा झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प सारखा क्षणाक्षणात बदलणारा आणि कोलांटउड्या मारणारा राष्ट्राध्यक्ष यापुढे भारताला परवडणारा नाही. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेला भारत उघड्या डोळ्यांनी पाहणे, ट्रम्प यांना सहन होण्यापलीकडचे आहे, त्यामुळे त्यांच्या तिरकस चाली सुरूच राहतील, हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज नाही, हे मात्र निश्चित !