देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस! केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

भुवनेश्वर – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावरून भाजपावर सर्वच विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. राजकीय फायद्यासाठी कोरोना साथीचा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपावर होत आहे. त्याचबरोबर सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील एका मंत्र्याने कोरोनावरील लस देशातील सर्व नागरिकांना मोफत देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. बालासोर येथे ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानिमित्त आयोजित प्रचारसभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रताप सारंगी यांनी ही माहिती दिली. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत मिळणार असून एका व्यक्तीला लस उपलब्ध करून देण्यासाठी पाचशे रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ओडिसा सरकारमधील आरोग्य मंत्री आर पी स्वॅन यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांच्यावर मोफत कोविड-१९ लसीवरून निशाणा साधला होता. बिहारमध्येच ही लस मोफत देणार का, याचे उत्तर या दोन्ही मंत्र्यांनी द्यावे, असा सवाल त्यांनी केला होता. यानंतर प्रताप सारंगी यांनी संपूर्ण देशालाच मोफत लस देणार असल्याचा दावा केला.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील भाजपाच्या या आश्वासनावरून निशाणा साधला आहे. ‘फक्त बिहारमध्येच का? मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क’, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर रविवारी ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोला केला. बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांगलादेशात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच इतर राज्यांमध्ये लस विकत देणार का? असा सवालही त्यांनी केला.





