अॅमेझॉनमध्ये १ लाख नवीन कामगारांची भरती सुरु

नवी दिल्ली | महाईन्यूज |
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरातील अन्य देशांमध्ये शिरकाव केला आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. चीनमध्ये वुहान शहरातील नागरिकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व नागरिकांना घरात बंदिस्त करण्यात आलं होतं. अशीच परिस्थिती अन्य देशांमध्ये सुरु आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे.
मात्र बाजारपेठा बंद असल्याने लोकांना घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ऑनलाइन विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याच पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने अमेरिकेत १ लाख नवीन कामगारांची भरती सुरु केली आहे. यात फुलटाइम आणि पार्टटाइम नोकरीची संधी देण्यात आली आहे. गोदाऊनपासून ते लोकांच्या घरापर्यंत माल घेऊन जाण्याचं काम या कर्मचाऱ्यांना करावं लागणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात ७ हजारांपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे त्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. त्यामुळे या लोकांचा कल ऑनलाइन शॉपिंगकडे वळाला आहे. आवश्यक लागणाऱ्या वस्तू ऑनलाइन मागवण्यात येत आहेत. त्यामुळे अॅमेझॉनला कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. सध्या कंपनीकडे ७ लाख ९८ हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांना आणखी १ लाख कर्मचाऱ्यांची गरज आहे. नवीन कर्मचाऱ्यांना तासाला कमीत कमी २ डॉलर ते १५ डॉलर पगार देण्यात येणार आहे.