breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लक्षवेधी : ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’द्वारे पिंपरी-चिंचवडकरांचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’?

भोसरीत उसळणार सायकलपटूंचा महापूर

आतापर्यंत तब्बल १६ हजारहून अधिक नोंदणी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे पिंपरी-चिंचवडकर जागतिक विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत या सायकल रॅलीसाठी तब्बल १६ हजारहून अधिक सायकलपटू-पर्यावरण प्रेमी नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष या रॅलीकडे लागले आहे.
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल प्रेमी अशा विविध संस्था, संघटनांच्या पुढाकाराने उद्या रविवार, दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी भोसरीतील गावजत्रा मैदानातून सकाळी ६ वाजता सायकल रॅली सुरू होणार आहे. या रॅलीसाठी सोशल मीडियासह विविध माध्यमातून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दि.२६ नोव्हेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल १६ हजार १९० लोकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे यांननी दिली.
पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सर्व शाळा, सोसायटी, कंपन्यामध्ये जावून पर्यावरण संवर्धना अंतर्गत सायकल चालवा पर्यावरण वाचवा, नदी स्वच्छताबाबत जागृती करीत आहोत. अधिकाधिक नागरिकांनी या ‘पर्यावरण जागर’मध्ये सहभागी व्हावे. लोकांचा प्रतिसाद पाहता प्रत्यक्षपणे यावर्षी किमान २५ हजार सायकलपटू- नागरिक या रॅलीत सहभागी होतील, असा दावाही डॉ. लोंढे यांनी केला आहे.
सेलिब्रेटी, मान्यवरांची उपस्थिती…
गेल्या पाच वर्षांपासून रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले जाते. यावर्षी ‘रिसायकल – रिड्युस – रियुज’ हा विषय घेऊन सायक्लोथॉन होणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रिती म्हस्के, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ‘पीएमआरडीए’ आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित राहणार आहेत.

स्वंयसेवी संस्था अन् संघटनांचा पुढाकार…

या अभिनव उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पर्यावरण गतविधी, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माजी सैनिक संघटना, पतंजली योग, महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमी संस्था, सर्व पर्यावरणप्रेमी संस्था आदींनी पाठींबा दर्शविला असून प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यातील एक रॅली ते ‘लीड’ करत आहे. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस फॉडेशन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका , पर्यावरणप्रेमी संस्थां यांच्या संयुक्त पुढाकाराने होणाऱ्या या रॅलीला प्रचंड गर्दी होणार असून, प्रशासनाने वाहतुकीत बदलही केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button