breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#LakhimpurKheri: “शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच;” केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची कबुली

उत्तर प्रदेश |

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. या हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूरमधील आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, मंत्री अजय मिश्रा आणि आशिष मिश्रा यांनी हे दावे फेटाळून लावत आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला होता. याच प्रकरणात मंत्री अजय मिश्रा यांनी महत्वाची कबुली दिली आहे.

“पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी होता. तो सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होता. माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नाही तर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता, तिथे हजारो लोक होते. त्याचे तिथले फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता. हजारो लोक आशिष मिश्रा कार्यक्रमात होते, असा जबाब देण्यास तयार आहेत,” असं केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलंय.

“कारवर हल्ला झाल्यानंतर, चालक जखमी झाला. यानंतर, वाहन अनियंत्रित झाले आणि तिथल्या लोकांच्या अंगावरून गेले. या घटनेत जीव गमावलेल्या लोकांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मी मागणी करतो. मात्र, माझा मुलगा घटनास्थळी नव्हता. जोपर्यंत वाहनाचा प्रश्न आहे, माझा ड्रायव्हर या हिंसाचारात ठार झाला आहे, तसेच दोन कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला, तर एक कार्यकर्ता या घटनेत बचावला आहे. आणखी तिघे जखमी झाले आहेत. त्यानंतर कार तिथेच थांबली. काही वेळाने कारला धक्का देण्यात आला आणि थारसह आणखी एक फॉर्च्युनर पेटवून देण्यात आली. हे लोक शेतकरी असूच शकत नाहीत. हे लोक शेतकऱ्यांमध्ये लपलेले अतिरेकी आहेत,” असं मिश्रा यांनी म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button